पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 07:56 AM2020-05-11T07:56:34+5:302020-05-11T08:01:13+5:30
जैश-ए-मोहम्मदमध्ये बहुतांश विदेशी अतिरेकी आहेत, परंतु पुलवामा कार हल्ल्याप्रमाण स्थानिक काश्मिरींचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याची योजना आखत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर सुरक्षा दलाला रेड अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. दहशतवादी कार बॉम्ब किंवा आत्मघाती बॉम्बद्वारे हल्ला करण्याची शक्यता असल्याचा संशय सुरक्षा दलाला आहे.
हिज्बुल मुजाहिद्दीनने रियाज नायकू चकमकीत ठार झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील संघटनेचा प्रमुख म्हणून गाजी हैदर उर्फ सैफुल्ला मीर याची नियुक्ती केली आहे. एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की गाजी हैदर हे त्याचे खोटे नाव आहे, गाजी म्हणजे इस्लामिक योद्धा आणि हैदर म्हणजे शूर. नव्या हिजबुल प्रमुखचा शोध लवकरच सुरू केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. दहशतवादी संघटनेने दुसरी फळीही तयार केली आहे. गाजी हैदरचा उपप्रमुख जफर उल इस्लाम असेल आणि अबू तारिकला मुख्य सैन्य सल्लागारची जबाबदारी देण्यात आली आहे.
सुरक्षा दलाची पहिली प्राथमिकता म्हणजे ११ मे रोजी जैश-ए-मोहम्मदचा संभाव्य हल्ला रोखणे ही आहे. अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटना या हल्ल्याची तयारी करत आहे.. गुप्तचर अहवालानुसार गेल्या आठवड्यात जैशचा प्रमुख मुफ्ती अब्दुल रऊफ असगरने आयएसआयच्या प्रमुखाची भेट घेतली.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, ११ मे हीच तारीख का निवडली त्यामागे कारण आहे. आज रमजानचा १७ वा दिवस आहे. याच दिवशी सौदी अरेबियामध्ये बद्रची लढाई सुरू झाली, जी काही शंभर सैनिकांनी जिंकली. इस्लामी इतिहासामधील हा एक मोठा विजय म्हणून पाहिला जातो तसेच हे एक महत्त्वपूर्ण वळण मानले जाते. याव्यतिरिक्त, पोखरणमधील अणू चाचणीच्या परीक्षणाचा २२ वा वर्धापन दिन आहे. ११ मे १९८८ रोजी भारत अणुऊर्जा संपन्न देश बनला होता.
जैश-ए-मोहम्मदमध्ये बहुतांश विदेशी अतिरेकी आहेत, परंतु पुलवामा कार हल्ल्याप्रमाण स्थानिक काश्मिरींचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी करण्याची शक्यता आहे. काश्मीर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानच्या या दहशतवादी गटासाठी हे कमी खर्चिक आहे. तसेच हा हल्ला स्थानिक काश्मिरींनी केला असा दावा करणेही पाकिस्तानला सोयीस्कर जातं.