पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी
By Admin | Published: February 12, 2016 03:18 PM2016-02-12T15:18:46+5:302016-02-12T15:56:09+5:30
पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने पाचवर्षांसाठी बंदी घातली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने पाचवर्षांसाठी बंदी घातली आहे.
या शिक्षेमुळे रौफ यांना बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत पंच म्हणून काम करता येणार नाही. आयपीएल २०१३ मधील सट्टेबाजी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात रौफ यांचा वॉंटेड आरोपी म्हणून समावेश केला आहे.
मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत हा बंदीच्या शिक्षेचा निर्णय घेण्यात आला. रौफ भ्रष्टाचार आणि गैरवर्तणूक प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
रौफ शिस्तपालन समितीसमोर हजर झाले नाहीत मात्र त्यांनी १५ जानेवारीला त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात स्पष्टीकरण देणारा अहवाल बीसीसीआयला पाठवला होता. शिक्षेचा निर्णय घेण्याआधी या स्पष्टीकरण अहवालाचा आढावा घेण्यात आला. रौफ यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले होते.
२०१३ सालच्या आयपीएल स्पर्धेत असद रौफ फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता.