अतिरेकी हल्ल्यानंतर पाकची ‘शरीफ’गिरी!

By admin | Published: January 6, 2016 02:20 AM2016-01-06T02:20:07+5:302016-01-06T02:20:07+5:30

अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईमुळे चार दिवसांपासून धुमसत असलेल्या पठाणकोट एअरबेसवर बंदुका शांत झाल्या असल्या तरी अद्यापही ‘आॅपरेशन पठाणकोट’ सुरू आहे.

Pakistanis 'Sharif' after the terror attack! | अतिरेकी हल्ल्यानंतर पाकची ‘शरीफ’गिरी!

अतिरेकी हल्ल्यानंतर पाकची ‘शरीफ’गिरी!

Next

पठाणकोट : अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईमुळे चार दिवसांपासून धुमसत असलेल्या पठाणकोट एअरबेसवर बंदुका शांत झाल्या असल्या तरी अद्यापही ‘आॅपरेशन पठाणकोट’ सुरू आहे. एअरबेसवर हल्ला करणारे सर्व सहा अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र आॅपरेशन अद्यापही संपलेले नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी जाहीर केले. विस्तीर्ण एअरबेसवर अभियान राबविणाऱ्या आणि मोठी हानी टाळणाऱ्या सुरक्षा दलांची पर्रीकर यांनी या वेळी प्रशंसा केली. मात्र याचवेळी काही ‘त्रुटी’ निश्चितपणे नडल्या, अशी प्रांजळ कबुलीही दिली. पंजाबच्या पठाणकोटमधील हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांना पूर्वकल्पना होती, असा दावा भारतीय गुप्तचर संस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईचे आश्वासन दिले. त्याचवेळी अमेरिकेनेही पाकिस्तानला शब्द पाळण्याबाबत बजावले आहे.
अतिरेकी हल्ला घडवून आणणाऱ्यांनी ज्या लोकांशी संपर्क केला, त्यांची ओळख पटल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या प्रकरणाच्या तपासात पाकिस्तानची मदत घेणार आहे, असे एनआयएचे प्रमुख शरद कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पठाणकोट हल्ल्याच्या कटकारस्थानाचा छडा लावणे हे मोठे आव्हान आहे. यात दीर्घ तपासाची गरज आहे. त्यामुळे मी अद्याप कुठलीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. पण हा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न असतील, असे ते म्हणाले.

काही त्रुटी नडल्या, हे मी मान्य करतो. परंतु सुरक्षेसोबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली गेली, असे मला अजिबात वाटत नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतीलच. सुरक्षेच्या प्रत्येक बाबीची तपशीलवार चर्चा होऊ शकत नाही. काही गोष्टी तपासासाठीही सोडा.
- मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री
आता धोरण कसे बदलले ? - काँग्रेस
काँग्रेस आज सत्तेवर असती
तर पाकवर हल्ले करीत जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी झाली असती. पठाणकोटवर हल्ल्यानंतरतसे काहीही होत नाहीय. टिष्ट्वटरवर शहिदांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्याचे एकमेव काम केले जात आहे, असा हल्ला काँग्रेसने केला.
‘त्या’ जवानांना शहिदांचा दर्जा
हल्ल्यादरम्यान प्राण गमावलेल्या सात सुरक्षा जवानांना शहिदाचा दर्जा मिळेल. युद्धात प्राण गमावलेल्यांना मिळणारे सर्व लाभ या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळतील, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
२४ तासांत अहवाल द्या
पोलीस अधीक्षकाच्या अपहरणानंतर घातपाताचे संकेत मिळूनही योग्य ती पावले का उचलली गेली नाहीत, याबाबत २४ तासांत स्पष्टीकरण द्या, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब पोलिसांना बजावले आहे.
निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासन
पठाणकोट हल्ल्यानंतर भारत-पाक द्विपक्षीय चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हल्ल्यातील अतिरेक्यांविरुद्ध त्वरित आणि निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. भारताने दिलेल्या ‘विशेष व कारवाईयोग्य’ पुरावे आणि माहितीच्या आधारावर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांविरुद्ध त्वरित पावले उचलावीत, यावर मोदींनी भर दिला.

Web Title: Pakistanis 'Sharif' after the terror attack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.