पाकिस्तानचे २० सैनिक ठार
By Admin | Published: October 30, 2016 06:31 AM2016-10-30T06:31:56+5:302016-10-30T06:31:56+5:30
भारतीय लष्कराने शनिवारी जोरदार हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेलगतच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाककडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला
श्रीनगर : भारतीय लष्कराने शनिवारी जोरदार हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेलगतच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाककडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. भारताच्या या आक्रमक कारवाईत पाकचे किमान २० सैनिक
ठार झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
भारतीय लष्कराच्या हल्ल्यात पाकच्या चार चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून, मोठी जीवितहानी घडवून आणण्यात आली आहे, असे लष्कराच्या नार्दर्न कमांडने ट्विटरवर म्हटले आहे. पाकच्या गोळीबारात भारतीय जवान नितीन सुभाष कोळी आणि मनदीपसिंह शहीद झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने आक्रमक कारवाई करून हिशेब चुकता केला. पाकने मनदीप याच्या मृतदेहाची विटंबना केली होती. यानंतर बीएसएफचे महानिरीक्षक अरुण कुमार यांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही सरकार आणि सुरक्षा दले भारतीयांची मान खाली जाऊ देणार नाहीत, असे सांगून जोरदार कारवाईचे संकेत दिले होते. भारताने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या पाक सैनिकांची संख्या दोन आकडी असू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
भारताच्या २९ सप्टेंबरच्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर (सर्जिकल स्ट्राईक) उभय देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. सर्जिकल
स्ट्राईकनंतर पाकने ५० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे
उल्लंघन केले आहे. यात जवानांसह ६ ते ७ भारतीय मृत्युमुखी पडले आहेत. तथापि, भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकचे २० हून अधिक लोक ठार झाले आहेत. भारतीय सैन्यदलाने गुरुवारी १५ पाकिस्तान रेंजर्सचा खात्मा केला होता.
पाकने शनिवारी जम्मू-काश्मीरच्या केरन भागात केलेल्या गोळीबारात एक जवान आणि एक महिला, असे दोन जण जखमी झाले. त्यानंतर भारतीय सैनिकांच्या बंदुका पाकवर तुटून पडल्या. (वृत्तसंस्था)