छुप्या युद्धास पाकचे अभय
By admin | Published: January 14, 2015 02:09 AM2015-01-14T02:09:53+5:302015-01-14T02:09:53+5:30
दहशतवादामुळे आपल्याच लोकांचे बळी जात असूनही, पाकिस्तान जम्मू-काश्मिरातील छुप्या युद्धाला अभय देत असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी केला आहे
नवी दिल्ली : दहशतवादामुळे आपल्याच लोकांचे बळी जात असूनही, पाकिस्तान जम्मू-काश्मिरातील छुप्या युद्धाला अभय देत असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी केला आहे. सीमेवर सतत सुरू असलेला गोळीबार आणि घुसखोरीच्या घटनांबाबत त्यांनी धोक्याचा इशारा दिला़
मंगळवारी वार्षिक पत्रपरिषदेत बोलताना, त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले़ गत महिन्यात पाकच्या पेशावरमधील एका लष्करी शाळेवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता़ या हल्ल्याचा उल्लेख करीत लष्करप्रमुख म्हणाले की, या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे मन बदलले की नाही, याची प्रतीक्षा करावी लागेल़ स्वत:च्या नागरिकांचे जीव जात असूनही छुप्या अतिरेकी कारवायांना पाकिस्तान अभय देत आहे़
सीमेपलीकडून सुरू असलेल्या सततच्या गोळीबाराबाबत विचारले असता ते म्हणाले की, सीमेवरील कडक पहाऱ्यामुळे अतिरेक्यांना भारतात घुसखोरी करणे अशक्य झाले आहे़ नियंत्रण रेषेऐवजी आता आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचा भंग सुरू आहे़ नियंत्रण रेषेवरील आपला कडक पहारा आणि घुसखोरीविरोधी व्यूहरचनेमुळे कदाचित यामुळे घुसखोरांनी आपला मोर्चा आंतरराष्ट्रीय सीमेकडे वळवला असावा़ आंतरराष्ट्रीय सीमेवरील खुली गटारे आणि नाल्यामुळे घुसखोरांना मदत मिळते़ मात्र भारतीय लष्कर घुसखोरीची समस्या निपटण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे़ भारतीय सुरक्षा दलाची प्रशंसा करताना ते म्हणाले की, जम्मू काश्मिरात सन २०१४ दरम्यान सुरक्षा दलाने राज्यात सर्वाधिक संख्येत अतिरेक्यांना निष्क्रिय केले़ ११० अतिरेक्यांपैकी १०४ अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले़ गतवर्षी ६५ अतिरेकी ठार झाले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)