पाकिस्तानचे नापाक कारस्थान उधळले! भारतीय अधिकाऱ्यांना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा होता डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 08:09 AM2017-12-17T08:09:05+5:302017-12-17T08:11:14+5:30
सातत्याने भारताला पाण्यात पाहणाऱ्या आणि भारतविरोधी कारवाया करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अजून एक नापाक कृत्य भारताने हाणून पाडले आहे.
नवी दिल्ली - सातत्याने भारताला पाण्यात पाहणाऱ्या आणि भारतविरोधी कारवाया करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अजून एक नापाक कृत्य भारताने हाणून पाडले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आयएसआयने हनिट्रॅप लावला होता. भारतीय अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणामुळे हा डाव उधळून लावण्यात यश मिळाले आहे. यासंदर्भात तीन भारतीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून, काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्यांनी आयएसआयच्या या डावाबाबत आपल्या विभागाला माहिती दिली होती.
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. भारतीय अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळवण्यासाठी आयएसआयने हा डाव आखला होता. मात्र या अधिकाऱ्यांनी या डावाला बळी पडत कोणतेही चुकीचे कृत्य केल्याचे समोर आलेले नाही. तिन्ही भारतीय अधिकाऱी चौकशीला सहकार्य करत असून, आतापर्यंत कोणत्याही दृष्टीकोनातून या अधिकाऱ्यांना संशयित मानण्यात आलेले नाही. भारतासंदर्भातील काही गोपनीय दस्तऐवज हस्तगत करण्यासाठी पाकिस्तान अशी चाल खेळू शकतो, असा संशय आधीपासूनच असल्याने हा डाव उधळून लावता आला. सध्यातरी या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सुरू असून, या अधिकाऱ्यांना पुन्हा पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येणार नाही, अशी शक्यता आहे.
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, "हे भारतीय अधिकारी पाकिस्तानमधील भाषा विभागात कार्यरत होते. भारतातून आलेल्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे भाषांतर करण्याचे काम हे अधिकारी करत असत. या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानकडून अनेक वेळा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. कनिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्तानमधील कुठल्यातरी गोपनीय ठिकाणी नेऊन त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवण्याचा डाव होता. या व्हिडिओंचा वापर करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात आयएसआय होती."
शत्रूराष्ट्रासंदर्भात गोपनीय माहिती हस्तगत गण्यासाठी अशा प्रकारचे सापळे जगभरात लावले जातात. मात्र, पाकिस्तानकडून भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आखण्यात आलेली योजना काहीशी धक्कादायक आणि चिंता वाढवणारी आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या या कटकारस्थानाबाबत भारताच्या अधिकाऱ्यांना आधीच सुगावा लागलेला असल्याने त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर भारत सरकराने या अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे.
आता या प्रकरणावर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय सरकारकडून पुढच्या काही दिवसांत घेण्यात येईल. तसेच या अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानकडून महिलांचा वापर झाला का याचीही चौकशी करण्यात येणार आहे.