पाकची पुन्हा आगळीक, अंदाधुंद गोळीबार
By admin | Published: March 14, 2017 12:24 AM2017-03-14T00:24:01+5:302017-03-14T00:24:01+5:30
पुुँछ सीमारेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच असून, त्यांच्या सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सोमवारी अंदाधुंद गोळीबार केल्याने येथील व्यापार सुविधा केंद्राचे नुकसान झाल्याने सीमेवरील
जम्मू : पुुँछ सीमारेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच असून, त्यांच्या सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सोमवारी अंदाधुंद गोळीबार केल्याने येथील व्यापार सुविधा केंद्राचे नुकसान झाल्याने सीमेवरील आवक जावक रोखण्यात आली. भारतीय जवानांनीही नंतर या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.
सुरक्षा प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी सकाळी पावणेसात वाजल्यापासून नियंत्रणरेषेनजीक भारतीय चौकी आणि नागरिकांना लक्ष्य बनवत गोळीबार सुरू केला. कोणतेही कारण नसताना पाकिस्तानने अचानक ही आगळीक केल्याचे प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर पाकिस्तानकडून गोळीबार कमी करण्यात आला. सध्या तुरळक प्रमाणात गोळीबार सुरू असून, आमच्या सेनेचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे या प्रवक्त्याने सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळे सीमेपलीकडे होणारी पुँछ-रावळकोट बससेवा स्थगित करण्यात आली आहे. पुँछच्या चकन-दा-बाग परिसरात असणाऱ्या व्यापार सुविधा केंद्राच्या दुमजली इमारतीचे नुकसान झाले. त्यामुळे ही इमारत मोकळी करण्यात आली.
या घटनेची संरक्षण मंत्रालय योग्य ती दखल घेईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले असून, पाकिस्तानच्या आगळीकीला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, असे सांगितले.