हल्लेखोरांकडे पाकची शस्त्रास्त्रे

By Admin | Published: September 19, 2016 05:52 AM2016-09-19T05:52:02+5:302016-09-19T07:26:10+5:30

भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले

Pakistan's arms to the perpetrators | हल्लेखोरांकडे पाकची शस्त्रास्त्रे

हल्लेखोरांकडे पाकची शस्त्रास्त्रे

googlenewsNext


श्रीनगर/ नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले तर इतर १९ जखमी झाले. प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता. हल्ल्यानंतर लष्कराने सुमारे तीन तास केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत चारही हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला. हे चारही हल्लेखोर पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे होते व त्यांच्याकडे पाकिस्तानी शस्त्रे होती, असे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्याने भारताविरुद्ध दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून यामागे असलेल्यांना धडा शिकविला जाईल, अशी ग्वाही दिली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नियोजित दौरा रद्द करून दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला व दहशतवादी पाकिस्तानला एकटे पाडण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही तातडीने काश्मीरला जाऊन साद्यंत माहिती घेतली तर लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी हल्ल्याच्या ठिकाणाला भेट देऊन तेथील सज्जतेची पाहणी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>दहा दिवसांपूर्वीच दिला होता अ‍ॅलर्ट
सीमा ओलांडून पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांची नवी तुकडी काश्मीरमध्ये घुसली आहे व त्यांचे लक्ष्य उरी हे असू शकते, अशा स्पष्ट माहितीचा अ‍ॅलर्ट गुप्तचर संस्थांनी तीनच दिवसांपूर्वी दिला होता, असे माहितगार सूत्रांकडून समजते.
श्रीनगरमधील लष्कराच्या १५व्या कॉर्पस््चे निवृत्त ध्वजाधिकारी व उरी येथील लष्करी तळाचे पूर्वी स्वत: कमांडर राहिलेले लेफ्ट. जनरल एस.ए. हसनैन यांनी तर टिष्ट्वटरवर याची जाहीर वाच्यताही केली. त्यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, दहाच दिवसांपूर्वी उरी येथील ब्रिगेड कमांडरना मी स्वत:
असा हल्ला केव्हाही होऊ शकतो याविषयी सावध केले होते.
दोन वर्षांपूर्वी उरी भागातीलच मोहरा येथील लष्करी छावणीवर असाच दहशतवादी हल्ला झाला होता. ते ठिकाण रविवारच्या हल्ल्यापासून जेमतेम १५ किमी अंतरावर आहे.
>असा झाला उरी हल्ला
उरी तळाच्या मागील बाजूस असलेल्या प्रशासकीय भागातून हे सशस्त्र दहशतवादी आत घुसले. तेथील मोकळ्या जागेत नव्याने आलेल्या तुकड्यांमधील सैनिकांसाठी तंबू व तात्पुरते निवारे उभारलेले होते.
हल्लेखोरांनी रायफलींमधून अंदाधुंद गोळीबार करतानाच आगीचे लोळ फेकणारी शस्त्रे डागली.
शहीद झालेल्या १७ जवानांपैकी १३-१४ जणांचा मृत्यू ते झोपलेल्या तंबूंना लागलेल्या आगीमुळे झाला. प्राणाहुती दिलेले बहुतांश जवान १० डोगरा आणि ६ बिहार रेजिमेंटचे होते.
१९ जखमी जवानांना हेलिकॉप्टरने श्रीनगर येथील लष्कराच्या बेस इस्पितळात हलविण्यात आले.
>चार एके-४७, रॉकेट लॉन्चर्स
या हल्ल्याविषयी प्रसिद्धिमाध्यमांना माहिती देताना लष्कराचे डायरेक्टर जनरल आॅफ मिलिटरी आॅपरेशन्स (डीजीएमओ) लेफ्ट. जनरल रणबीर सिंग म्हणाले की, हे हल्लेखोर परकीय होते. यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याची आमची प्राथमिक माहिती आहे. लष्कराने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत जे चार हल्लेखोर ठार झाले त्यांच्याकडे चार एके-४७ रायफल, अंडर बॅरेल रॉकेट लॉन्चर्स आणि अन्य प्रकारचे युद्धसाहित्य मिळाले. या सर्व शस्त्रांवर पाकिस्तानची मार्किंग्ज् आहेत. (म्हणजेच ही शस्त्रे पाकिस्तानी बनावटीची आहेत.)
पाक म्हणतो, आमच्या माथी खापर नको
पाकिस्तानने मात्र या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नाही. जरा काही खुट्ट झाले की कोणतीही शहानिशा न करता आमच्या माथी खापर फोडण्याची भारताला खोड जडली आहे, असा कांगावा करून हात वर केले.

Web Title: Pakistan's arms to the perpetrators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.