पाकचा 11 जवानांना मारल्याचा दावा खोटा - भारतीय लष्कर
By admin | Published: November 17, 2016 09:11 AM2016-11-17T09:11:36+5:302016-11-17T09:38:04+5:30
14 नोव्हेंबर रोजी नियंत्रण रेषेवर भारताच्या 11 जवानांना मारल्याचा कांगावा पाकिस्तानी लष्काराने केला आहे. भारतीय लष्कराने हा दावा फेटाळून लावला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताविरोधात अनेक खोटे दावे केले जात आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे, 14 नोव्हेंबर रोजी नियंत्रण रेषेवर भारताच्या 11 जवानांना मारल्याचा दावा पाकिस्तानी लष्काराने केला आहे.
मात्र, भारतीय जवान मारले गेल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत भारतीय लष्कराने हे वृत्त फेटाळून लावले आहे. '14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच 14 नोव्हेंबर रोजी भारतीय जवान मारले गेल्याचा पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचा दावादेखील खोटा आहे', असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्नान घातले. यासंदर्भात बोलताना, 'नियंत्रण रेषेजवळ भारताने केलेल्या गोळीबारात ज्या दिवशी पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले, त्यावेळी पाकिस्तानी लष्कराने जवळपास 11 भारतीय जवानांना मारले', असा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी बुधवारी केला.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्तानने जवळपास 40-44 भारतीय सैनिकांना मारल्याचेही राहील शरीफ म्हणाले आहेत. मात्र भारतीय लष्कर ही बाब स्वीकारण्यास नकार देत असून झालेले नुकसान स्वीकारण्याची हिंमत भारताने दाखवावी, असा कांगावादेखील राहील यांनी केला आहे. तसेच 'आक्रमक कारवाईतून काहीही निष्पन्न होणार नाही', असा संदेशदेखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.