पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
By admin | Published: May 14, 2017 09:55 AM2017-05-14T09:55:29+5:302017-05-14T09:55:29+5:30
-सीमारेषेवरील वाढत्या हल्ल्यांवरुन पाकिस्तानचे शेपूट वाकडेच असल्याचेच दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 14 -सीमारेषेवरील वाढत्या हल्ल्यांवरुन पाकिस्तानचे शेपूट वाकडेच असल्याचेच दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. शनिवारी रात्रीदेखील पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने सात गावांना लक्ष्य केले. यानंतर भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानने लहान व स्वयंचलित शस्त्रे, तसेच 82 मिमी व 120 मिमीच्या तोफांचा वापर केला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी सीमारेषेवरील तणावामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीकच्या शाळा शनिवारपासून बेमुदत काळासाठी बंद करण्यात आल्या असून, सीमेवरील खेड्यांतील रहिवाशांना इतरत्र हलवण्यात येत आहे.
दरम्यान शनिवारीदेखील जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची 10 मे पासूनची ही चौथी घटना असून त्यात आतापर्यंत तीन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत.