पाकिस्तानचे पुन्हा हात वर!
By admin | Published: August 7, 2015 01:54 AM2015-08-07T01:54:59+5:302015-08-07T01:54:59+5:30
उधमपूर येथे बुधवारी पकडण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नावेद उर्फ उस्मान हा पाक नागरिक असल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळला असून,
इस्लामाबाद/ नवी दिल्ली : उधमपूर येथे बुधवारी पकडण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नावेद उर्फ उस्मान हा पाक नागरिक असल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळला असून, भारताने पाकवर आरोप करताना संयम पाळावा असेही म्हटले आहे.
भारताने पाकिस्तानचे हे म्हणणे अमान्य करीत मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात पकडलेला मोहम्मद अजमल कसाब हाही आमचा नागरिक नाही, असे म्हणणाऱ्या पाकिस्तानला नंतर ते मान्य करावे लागले होते, याचे स्मरण दिले आहे. दरम्यान, पाकमधील आघाडीची इंग्रजी दैनिके ‘डॉन’ व ‘द नेशन’ यांनी मात्र आपल्या बातम्यांमध्ये नावेद हा पाकिस्तानीच असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद काझी खलिलुल्ला यांनी यासंदर्भाततील टिपणी केली आहे. आम्ही प्रसारमाध्यमातील बातम्या पाहिल्या आहेत. त्यावर मी काही बोलणार नाही. भारतीय अधिकाऱ्यांनी पाकवर कोणताही आरोप करताना, त्याबरोबर पुरावेही सादर करावेत अशी आमची मागणी आहे. भारतात कोणतीही घटना घडली की तत्काळ पाकिस्तानवर आरोप केला जातो, हे अयोग्य आहे. भारताने आरोप करताना पुरावेही द्यावेत; तरच वस्तुस्थितीवर आरोप खरे ठरतील, असे खलिलुल्ला यांनी सांगितले.
पाकिस्तानचे म्हणणे असे की, आमच्याकडे नागरिकांची नोंद ‘नॅशनल डेटाबेस’मध्ये आहे व त्यात नावेदचे नाव नाही. परंतु भारत सरकार म्हणते की, पाकिस्तानची लोकसंख्या १८ कोटी अहे व डेटाबेस जेमतेम ९ कोटी नागरिकांचा आहे. त्यामुळे त्याआधारे केलेला दावा अजिबात विश्वासार्ह नाही.
उधमपूर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भारत-पाक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक रद्द करा, अशी मागणी सेनेने गुरुवारी लोकसभेत केली. पाकसोबत कोणतीही चर्चा केली जाऊ नये. २३-२४ आॅगस्ट रोजी होणारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकही रद्द करावी, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.
पाकिस्तानने भारतात अतिरेकी पाठविणे थांबवावे तसेच अलीकडील गुरुदासपूर हल्ल्याबाबत तपासात मदत केल्याखेरीज या देशांसोबत कुठल्याही स्तरावर द्विपक्षीय चर्चा केली जाऊ नये, असे ते गृहमंत्र्यांना उद्देशून म्हणाले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा तालीब
हुसैन नामक संशयित अतिरेकी ठार झाला.
पुन्हा अतिरेकी हल्ला : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात अतिरेक्यांनी गुरुवारी रात्री पुन्हा पोलीस चौकीवर हल्ला चढवला. यात २ विशेष पोलीस अधिकारी जखमी झाले. कालच येथे झालेल्या हल्ल्याच्या वेळी पाक अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरूच होती.
आपण पाठविलेला दहशतवादी काश्मीरमध्ये जिवंत पकडला गेला व मुंबईवरील हल्ला पाकिस्तानच्याच भूमीतून केला गेल्याच्या माजी तपास प्रमुखाच्या कबुलीने पितळ उघडे पडले तरी पाकिस्तानच्या वतीने भारतात दहशतवाद पसरविणाऱ्या आयएसआयची खुमखुमी अजून जिरलेली नाही. पाकच्या या गुप्तहेर संघटनेचे माजी प्रमुख जनर हमीद गुल यांनी आता अणुबॉम्ब टाकून दिल्ली व मुंबई बेचिराख करण्याची दर्पोक्ती केली आहे. कोण नरेंद्र मोदी, आमच्यासमोर तो कोणी नाही, आमच्याकडे सर्व साधने आहेत, योजना, तंत्रज्ञान तयार आहे. आम्ही भारताचे तुकडे-तुकडे करू शकतो आणि करून दाखवू, असे त्याने म्हटले.
(वृत्तसंस्था)