पाकचा हिंदू हेर जेरबंद

By admin | Published: August 20, 2016 01:34 AM2016-08-20T01:34:24+5:302016-08-20T01:34:24+5:30

इंटेलिजन्स ब्युरो, रॉ आणि इतर भारतीय गुप्तचर संघटनांनी संयुक्तरीत्या कारवाई करून नंदलाल महाराज मेघवाल या पाकिस्तानी गुप्तहेराला शुक्रवारी राजस्थानच्या जैसलमेर शहरात

Pakistan's Hindu Man Jerband | पाकचा हिंदू हेर जेरबंद

पाकचा हिंदू हेर जेरबंद

Next

जैसलमेर : इंटेलिजन्स ब्युरो, रॉ आणि इतर भारतीय गुप्तचर संघटनांनी संयुक्तरीत्या कारवाई करून नंदलाल महाराज मेघवाल या पाकिस्तानी गुप्तहेराला शुक्रवारी राजस्थानच्या जैसलमेर शहरात जेरबंद केले. दहशतवादी कारवायांसाठी पाकमधून आतापर्यंत ३५ किलो आरडीएक्स भारतात आणण्यात आल्याची कबुली त्याने दिली असल्याचे समजते. पाक अतिरेक्यांनी प्रथमच हिंदू व्यक्तीचा अतिरेकी कारवायांसाठी वापर केल्याचे स्पष्ट झाले असून, ही भारतासाठी धोक्याची घंटा मानली जाते.
नंदलाल (२६) पाकची गुप्तचर संघटना आयएसआयचा हेर असून, त्याच्याकडून गोपनीय माहिती हस्तगत केल्याचा दावा पोलिसांनी केला. एका हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडील मायक्रो एसडी कार्डमध्ये लष्कराची प्रतिष्ठाने आणि वाहनांच्या छायाचित्रांशिवाय इतर गोपनीय माहिती होती. चौकशीसाठी त्याला जयपूरला नेण्यात येत आहे. नंदलाल राजस्थानच्या सीमावर्ती भागात राहणारे समाजकंटक आणि तस्करांच्या कायम संपर्कात होता.
तो सुरक्षा, गुप्तचर संस्था आणि त्यांच्या कामांची माहिती मिळवून ती आयएसआयला पुरवीत असे. सीमावर्ती भागातील आपल्या स्रोतांच्या संपर्कात राहण्यासाठी तो व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक आणि स्काईपचा वापर करीत असे. त्याच्याकडून दोन मोबाईल, अनेक सीम कार्ड व एक सॅटेलाईट फोन जप्त करण्यात आला. याशिवाय त्याच्याकडे अनेक दूरध्वनी क्रमांक आणि काही महत्त्वाचे नकाशे आढळून आले. नंदलाल व्हिसाद्वारे अनेकदा भारतात आला. त्याच्याकडे केवळ जोधपूरसाठीचा व्हिसा होता. मात्र, व्हिसा नियमांचे उल्लंघन करून तो जैसलमेरला आला.
आरडीएक्सचे ठिकाण हुडकून काढण्यास एटीएसला पाचारण करण्यात आले. नंदलालला पकडण्यासाठी टाकलेल्या धाडीदरम्यान त्याचे सात ते आठ साथीदार फरार झाले. यापूर्वी बहादूर अली या पाकिस्तानी दहशतवाद्याला जम्मू-काश्मिरात अटक झाली होती. नंदलाल पाकच्या सिंध प्रांतातील संगर जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंब तेथेच राहते. नंदलालचे तेथे कपड्याचे दुकान आहे. संगर जिल्हा जैसलमेरजवळ आहे.तेथील बोलीत साम्य असल्याचा तो गैरफायदा घेत होता. पैशाखातर आपण हेर बनल्याचे त्याने सांगितले. त्याच्या डायरीत पाक गुप्तचर संस्थेदरम्यान झालेल्या देवाण-घेवाणीच्या नोंदी आहेत. (वृत्तसंस्था)

पाकिस्तानी हिंदूंबाबत संशयाचे वातावरण
- पाकचा हिंदू हेर पकडला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. हिंदू नागरिकाचा हेर म्हणून वापर करण्याची पाकच्या गुप्तचर यंत्रणेची वा अतिरेक्यांची ही नवी खेळी आहे.
- बांगलादेश, अफगाण व पाकमधील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर धर्मांचे अनेक लोक छळ टाळण्यासाठी भारताच्या आश्रयाला आले आहेत. भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, अशी त्यांची मागणी सरकार पातळीवरही त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
- असे असताना हिंदू व्यक्ती पाकसाठी हेरगिरी करताना आढळून आल्यामुळे भारतात आश्रय घेतलेल्या पाकिस्तानी हिंदूंबाबत संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

Web Title: Pakistan's Hindu Man Jerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.