शीख सैनिकांना भडकवण्याचा पाकिस्तानचा नापाक डाव
By Admin | Published: October 19, 2016 12:40 PM2016-10-19T12:40:21+5:302016-10-19T13:57:30+5:30
पाकिस्तानवर हल्ला करण्यास सांगितल्यानंतर एका भारतीय शीख सैनिकाने आत्महत्या केल्याची अफवा पसरवणारी एक पोस्ट सध्या पाकिस्तानी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 19 - युद्धांमध्ये झालेल्या पराभवानंतरही पाकिस्तानने कोणताच धडा घेतलेला नसून अद्यापही नापाक कट आखणं सुरु आहे. यावेळी भारतीय लष्कराचं खच्चीकरण करण्याच्या आणि शीख सैनिकांना भडकवण्याच्या हेतूने पाकिस्तानने नवा कट आखला आहे. पाकिस्तानवर हल्ला करण्यास सांगितल्यानंतर एका भारतीय शीख सैनिकाने आत्महत्या केल्याची अफवा पसरवणारी एक पोस्ट सध्या पाकिस्तानी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
यानंतर भारतीय लष्कर सतर्क झालं असून कोलकातामधील मुख्यालयासहित देशभरातील कमांडर मुख्यालयांना अलर्ट दिला आहे. लष्कर मुख्यालयाने व्हायरल झालेल्या ट्विट्समधील माहिती वरिष्ठ अधिका-यांना पाठवली असून याबाबत सैनिकांना योग्य माहिती देऊन परिस्थितीची कल्पना देण्याचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तानी ट्विटर हँडल्स आणि इतर सोशल मीडियावर हॅशटॅग #RestinPeacebalbirSingh च्या माध्यमातून ही अफवा पसरवली जात आहे. हिंदूंकडून होणा-या अत्याचारामुळे आणि पाकिस्तानवरील प्रेमाखातर एका शीख सैनिकाने आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर शीख सैनिकांची पाकिस्तानविरोधात युद्ध करण्याची इच्छा नसल्याचा दावाही करण्यात आला आहे. अशा आशयाचे दोन ट्विट्स पाठवण्यात येत आहेत. याबाबत कमांडर आणि सैनिकांना अलर्ट करा असा आदेश लष्कर मुख्यालयाकडून देण्यात आला आहे.
#RestInPeaceBalbirSingh Balbir Singh proves that Its better to die b4 committing this sin to attack PAKISTAN land of Baba Guru Nanak Dev ji pic.twitter.com/fVm2fP3eRK
— AK47 (@KhatijahFatima) October 17, 2016
पाकिस्तानचा डाव -
एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार बलबीर सिंह नावाच्या कोणत्याच सैनिकाने आत्महत्या केलेली नाही. भारतीय सैन्यांमध्ये अस्वस्थता पसरवण्याच्या हेतूने ही अफवा पसरवली जात असल्याचा आरोप अधिका-याने केला आहे. नियंत्रण रेषा पार करुन करण्यात आलेल्या कारवाईचा कोणत्याच सैनिकाने विरोध केला नसल्याचंही अधिका-याने सांगितलं आहे.