लष्करातील महिला कर्नलला अश्लील फोटोवरुन ब्लॅकमेल करणा-या पाकिस्तानच्या आयएसआय एजंटला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 11:34 AM2017-09-19T11:34:26+5:302017-09-19T11:43:23+5:30
भारतीय लष्कराच्या महिला कर्नलला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणा-या आयएसआय एजंटला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
नवी दिल्ली, दि. 19 - भारतीय लष्कराच्या महिला कर्नलला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणा-या आयएसआय एजंटला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. आयएसआयच्या हस्तकाने महिला अधिका-याकडे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा संवदेनशील ठिकाणांची माहिती मागितली होती. पण महिला अधिका-याने त्याचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर आयएसआय हस्तकाने महिला अधिका-याचे मॉर्फकरुन बनवलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली व ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. द पायोनीरने हे वृत्त दिलं आहे.
महिला कर्नलने तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी उत्तर दिल्लीतील चांदनी महल परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. मोहम्मद परवेझ असे आरोपीचे नाव असून, त्याच्यासोबत काम करणा-या आणखी तीन हेरांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. लष्करात अधिकारी पदावर असणारी ही महिला दिल्लीत द्वारका येथे राहते. मला अज्ञात क्रमांकावरुन फोन येत आहेत तसेच इक्ता शर्मा नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन आपल्याला मेसेज आल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते.
आरोपीने माझ्या व्हॉटसअॅप नंबरवर माझे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले तसेच इक्ता शर्माच्या फेसबुक आयडीवरुन मला दोन मेसेज आले होते. या महिला अधिका-याच्या मोबाइलवरही धमकीचेही फोन आले. कॉल करणा-या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर, अश्लील फोटो आणि व्यक्तीगत माहिती सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देण्यात आली होती.
जेव्हा महिला कर्नलने दोन्ही नंबर ब्लॉक केले तेव्हा आरोपीने इक्ता शर्माच्या फेसबुक अकाऊंटवरुन तिचा मॉर्फ केलेला फोटो मुलीच्या फेसबुक अकाऊंटवर पाठवला. तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. मोबाईल फोनच्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांनी चांदनी महल परिसरातून अटक केली.
दिल्ली पोलिसांनी दहशतवादविरोधी पथकाकडे हे प्रकरण हस्तांतरीत केले आहे. आरोपीने भारताच्या सुरक्षेसंदर्भात काही माहिती आयएसआयला दिल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात पाकिस्ताना हाय कमिशनमध्ये काम करणा-या नौशाद नावच्या व्यक्तीला परवेझने सीमकार्डही दिले होते.