‘पाकिस्तानचा कर्तारपूर निव्वळ दिखावा’ भारताने प्रस्ताव केला अमान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:05 AM2020-06-28T00:05:16+5:302020-06-28T00:05:35+5:30
भारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे बंद
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या १६ मार्चपासून बंद असलेला कर्तारपूर कॉरिडॉर महाराजा रणजितसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या सोमवारपासून (२९ जून) पुन्हा खुला करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने अमान्य केला आहे. पाकिस्तान कॉरिडॉर खुले करण्यास तयार असले तरी भारतातून तेथे शीख यात्रेकरूंना पाठविणे शक्य नसल्याने हा निव्वळ दिखावा असल्याचे भारताचे म्हणणे आहे.
भारतातील पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक देव गुरुद्वारा ते पाकिस्तानमधील कर्तारपूर गुरुद्वारा यांना जोडणारा अलीकडेच बांधण्यात आलेला ४.३ कि.मी. लांबीचा विशेष रस्ता कर्तारपूर कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. हा कॉरिडॉर येत्या सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी टष्ट्वीटरवर जाहीर केले होते.
त्यावर प्रतिक्रिया देताना भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, हा कारिडॉर बांधताना दोन्ही देशांमध्ये जो समझोता झाला आहे, त्यानुसार यात्रेकरूंच्या येण्या-जाण्याची किमान सात दिवस आधी पूर्वसूचना दिली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे केवळ दोन दिवस आधी कळवून यात्रेकरूंना जाणे शक्य नाही. शिवाय भारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास बंद केला आहे, तसेच दोन्ही देशांमधील कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे.