दहशतवाद्याने केली पाकिस्तानची पोलखोल
By admin | Published: July 28, 2016 11:46 AM2016-07-28T11:46:24+5:302016-07-28T12:02:21+5:30
काश्मीरच्या नौगाव सेक्टरमधून जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याने आपण पाकिस्तानचे रहिवासी असल्याची कबुली राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिली आहे
Next
>
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 28 - काश्मीरच्या नौगाव सेक्टरमधून जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याने पाकिस्तानची पोल खोलली आहे. या दहशतवाद्याचं नाव बहादूर अली असून आपण लाहोरचे रहिवासी असल्याचं त्याने कबूल केलं आहे. 22 वर्षीय बहादूर अलीने आपल्याला लष्कर-ए-तोयबाने प्रशिक्षण दिल्याचंही सांगितलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) बहादूर अलीची चौकशी करत असून त्याला चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आलं आहे.
कुपवाडा जिल्ह्यातील नौगाव सीमारेषेवर जवान आणि दहशतवाद्यांची चकमक झाली होती. यावेळी भारतीय जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळाले होते. त्याची चौकशी केली असता तो पाकिस्तानचा रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्याकडे 23 हजार रुपयांचे भारतीय चलन, 3 एके-47 रायफल आणि 2 पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. गेल्या 2 महिन्यात जिवंत पकडण्यात आलेला बहादूर अली दुसरा दहशतवादी आहे.
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार चौकशीदरम्यान दहशतवाद्याने सुरक्षा यंत्रणांना अत्यंत महत्वाची माहिती देत अनेक खुलासे केले आहेत. दहशतवाद्याने मास्टर प्लानचा खुलासा केल्याचंही सुत्रांकडून कळलं आहे. मुझफ्फराबादमध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी तयार केले जात असल्याचंही दहशतवाद्याने चौकशीत सांगितलं आहे.
काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांची महत्वाची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहे. बहादूर अली आपल्या 4 साथीदारांसोबत आत्मघाती हल्ल्याची तयारी करत होता. याशिवाय बु-हान वानीसारखे पोस्टर बॉय तयार करण्याची जबाबदारीही यांच्यावर देण्यात आली होती.
दहशतवादी बहादूर अलीला विचारण्यात आलेले 4 प्रश्न -
- तुझं नाव काय ?
बहादूर अली
- तुझी जन्मतारीख ?
17.12.1995
- तु कुठे राहतोस ?
पाकिस्तानच्या लाहोर जिल्ह्याचा मी रहिवासी आहे. रायविंड तालुक्यातील जिया बग्गा माझं गाव आहे.
- शस्त्रांचं प्रशिक्षण कुठे घेतलं ?
मुझफ्फराबाद कॅम्पमध्ये आम्ही प्रशिक्षण घेतलं. जागा माहित नाही, पण आम्हाला 21 दिवस प्रशिक्षण देण्यात आलं.