बॉर्डरजवळ पाकचे ‘नापाक’ ड्रोन पाडले, घुसखोरांना हुसकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 09:26 AM2022-11-27T09:26:22+5:302022-11-27T09:26:44+5:30
पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील दाओके गावाजवळ एका पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी केली होती
चंडीगड : पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री घुसखोरीचे तीन प्रयत्न झाले. तथापि, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दक्ष जवानांनी ते हाणून पाडले. अमृतसर सेक्टरमध्ये दोन ड्रोन भारतीय हद्दीत घुसू लागताच जवानांनी गोळीबार करून एकाला पाडले, तर दुसऱ्याला मागे परतण्यास भाग पाडले. अन्य एका घटनेत पठाणकोट सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन तस्करांनाही जवानांनी हुसकावून लावले.
पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील दाओके गावाजवळ एका पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी केली होती. बीएसएफने गोळीबार करून ते पाडले. अमृतसर शहराच्या नैर्ऋत्येला ३४ किमी अंतरावर ही घटना घडली. बीएसएफ जवानांनी नंतर शोधमोहीम राबवून हे ड्रोन जप्त केले. चिनी बनावटीच्या या ड्रोनचे अंशत: नुकसान झाले आहे. रात्री दहा वाजता ही घटना घडली. त्यानंतर काही वेळाने पंजगराई चौकीजवळ पुन्हा ड्रोनचा आवाज आला. जवानांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर ते मागे फिरले.
घुसखोरांना हुसकावले
रात्री पठाणकोट सेक्टरमधील फराईपूर चौकीजवळ गस्त घालणाऱ्या जवानांनी थर्मल कॅमेऱ्यांच्या मदतीने दोन घुसखोरांना शोधून काढले. १२१ बटालियनच्या जवानांनी दक्षतेसाठी गोळीबार केल्याने त्यांना मागे फिरावे लागले.