पाकचे सार्क संमेलन बारगळले
By Admin | Published: September 29, 2016 06:20 AM2016-09-29T06:20:05+5:302016-09-29T06:20:05+5:30
भारतासह चार देशांनी सार्क संमेलनात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर हे संमेलनच आता बारगळल्यात जमा आहे. हे संमेलन रद्द होणार असल्याची माहिती नेपाळच्या राजकीय
नवी दिल्ली : भारतासह चार देशांनी सार्क संमेलनात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर हे संमेलनच आता बारगळल्यात जमा आहे. हे संमेलन रद्द होणार असल्याची माहिती नेपाळच्या राजकीय क्षेत्रातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानेही तसे संकेत दिले आहेत.
सार्क संमेलनाबाबत नेपाळच्या मीडियात येणाऱ्या वृत्ताला विशेष महत्त्व आहे. कारण, नेपाळ हा या आठ सदस्यीय समूहाचा वर्तमान अध्यक्ष आहे. भारताने आपला निर्णय यापूर्वीच नेपाळला कळविला आहे. या संमेलनाबाबत काही वाद असल्यास ते सोडविण्याची जबाबदारी वर्तमान अध्यक्ष म्हणून नेपाळकडे आहे; पण सद्य:परिस्थितीत असा कोणताही तोडगा दिसत नाही. काठमांडूतील या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, यातील सदस्य देशांनी सहभागास नकार दिल्याने हे संमेलन रद्द केल्याचे स्पष्ट केले जाईल; पण याबाबतचा निर्णय मात्र नेपाळ घेणार नाही. भारतासह चार देश बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तानने या संमेलनात सहभागी न होण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तूर्तास ही परिस्थिती बदलता येणार नाही, असेही नेपाळच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या चारही देशांनी आपल्या निर्णयाची माहिती नेपाळला दिली आहे.
उरीतील हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक स्तरावरून दबाव वाढत असल्याचे यावरून मानले जात आहे. सीमेपलीकडून अतिरेकी हल्ले होत असल्याने यात सहभागी होत नसल्याचे कारण भारताने दिले असून, अन्य तीन देशांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, सार्क संमेलन रद्द होणार असल्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती बांगलादेशच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. तथापि, एखादा देश या संमेलनात सहभागी न झाल्यास हे संमेलन आपोआपच रद्द होते, असे सार्कच्या घोषणापत्रात नमूद केलेले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाकने दिले संमेलन रद्द होण्याचे संकेत
भारताने सार्क संमेलनात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर सार्क संमेलन रद्द होण्याचे संकेत पाकिस्तानने बुधवारी दिले आहेत. विदेश विभागाचे सल्लागार सरताज अजीज म्हणाले की, सार्कच्या नियमानुसार एखादा देश जर संमेलनात सहभागी झाला नाही तर संमेलन होऊ शकत नाही.