दहशतवादाचे दुसरे नाव पाकिस्तान: काँग्रेस
By admin | Published: September 23, 2016 01:35 AM2016-09-23T01:35:16+5:302016-09-23T01:35:16+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात ज्या प्रकारे अतिरेक्यांचे उदात्तीकरण केले, त्यावरून स्पष्ट होते की, दहशतवादाला मदत करणे, हे पाकिस्तान सरकारचे धोरण आहे.
शीलेश शर्मा,नवी दिल्ली
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात ज्या प्रकारे अतिरेक्यांचे उदात्तीकरण केले, त्यावरून स्पष्ट होते की, दहशतवादाला मदत करणे, हे पाकिस्तान सरकारचे धोरण आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसने जगातील देशांना आवाहन केले आहे की, त्यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा ओळखावा. कारण पाकिस्तान हा फ्रान्स, बांगलादेश, अमेरिका, ब्रिटन, बेल्जियमसह जगभरातील अतिरेक्यांना आश्रय देत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आपण सरकारसोबत असल्याचे दाखवून देत, काँग्रेसने स्पष्ट केले की, राष्ट्रहिताच्या प्रत्येक निर्णयाबाबत आपण सरकारसोबत आहोत. सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणीही काँग्रेसने केली, जेणेकरून संपूर्ण देश एका सुरात उभा असल्याचे दिसून येईल.
पाकिस्तानबाबत काँग्रेसची भूमिका सरकारपेक्षाही अधिक आक्रमक आहे, असे या वक्तव्यांवरून दिसून येते. पाकिस्तान हा देश पूर्णपणे आयएसआय आणि सैन्याच्या इशाऱ्यावर चालत असल्याचेही काँगे्रसने म्हटले आहे. त्यामुळेच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र बनला आहे. येथे अतिरेक्यांचे पोषण केले जात आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आता संयुक्त राष्ट्र संघात बोलताना पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारत मजबूतपणे आपली बाजू मांडू शकेल. तर जगालाही कळून चुकेल की, कशा प्रकारे पाकिस्तान हे दहशतवादाचे दुसरे नाव आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, नवाज शरीफ यांना हे माहीत नाही काय की, मौलाना मसूद अजहर, दाउद, हाफिज सईद यांच्यासारखे कुख्यात अतिरेकी हे पाकिस्तानातील आयएसआयच्या इशाऱ्यावरून जगभरात दहशतवाद पसरवित आहेत.
लादेन पाकिस्तानात अबोटाबादमध्ये सैन्याच्या मुख्यालयाजवळच सापडला होता, हे जग विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले. बुऱ्हान वाणी याचे शरीफ यांनी ज्या प्रकारे उदात्तीकरण केले, त्यावरून पाकिस्तान आणि दहशतवाद यांच्यात काय नाते आहे, हे सांगण्याची गरजच नाही.