पाकिस्तानला चोख उत्तर
By admin | Published: May 24, 2017 03:30 AM2017-05-24T03:30:29+5:302017-05-24T03:30:29+5:30
भारताच्या दोन जवानांचे शिर धडावेगळे केल्याचा बदला ९ दिवसांतच घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्लाबोल केला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताच्या दोन जवानांचे शिर धडावेगळे केल्याचा बदला ९ दिवसांतच घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्लाबोल केला असून, या गोळीबारात चौक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सैन्याने याबाबतचा एक व्हिडीओही रीलीज केला आहे. केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे.
भारतीय जवानांनी केलेल्या हल्ल्यात रॉकेट लाँचर, अँटी टँक गाईडेड मिसाईल, स्वयंचलित ग्रेनेड लाँचर आणि बंदुका यांचा उपयोग करण्यात आला. या हल्ल्यात १५ ते २५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असावेत, असा अंदाज आहे. नौशेरा भागातील या प्रतिहल्ल्याबाबत सैन्याने तपशील दिला नाही. नौशेरा हा भाग जम्मू येथील सीमेला लागून आहे. माहिती व संपर्क विभागाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल ए.के. नरुला यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्यांवर भारतीय जवानांनी हल्ला केला.
हा हल्ला म्हणजे पाकिस्तानला संदेश होता की, सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांना सैन्य हाणून पाडेल. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी टिष्ट्वटद्वारे या कारवाईचे सरकार समर्थन करीत असल्याचे स्पष्ट केले. जम्मू-काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यास अशी कारवाई आवश्यक आहे. अन्य एका टिष्ट्वटमध्ये त्यांनी म्हटले की, घुसखोरीचे समर्थन करणाऱ्या नियंत्रणरेषेपलीकडील पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
२४ सेकंदांचा व्हिडीओ
सैन्याने या कारवाईचा २४ सेकंदांचा व्हिडीओ जारी केला आहे. जंगलाच्या भागात एका डोलाऱ्यावर सतत केल्या जाणाऱ्या गोळीबारामुळे तो कोसळत आहे. हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या भागातील आहे ते मात्र समजत नाही.
घुसखोरी वाढल्याने...
भारतीय लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी मोहिमेचा
भाग म्हणून नियंत्रणरेषेच्या पलीकडून घुसखोरीला मदत करणाऱ्यांवरच कारवाई करण्यात आली आहे. मेजर जनरल नरुला म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य या घुसखोरांना शस्त्रास्त्रे पुरवीत आहे. हे घुसखोर नियंत्रणरेषेजवळच्या गावांना लक्ष्य करीत आहेत. बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर घुसखोरी वाढण्याची शक्यता व्यक्त करून नौगाम भागात २०-२१ मे रोजी चार अतिरेक्यांना मारल्याच्या घटनेची त्यांनी आठवण करून दिली. त्या कारवाईत भारताचे तीन जवान शहीद झाले होते.
नौशेरा भागात भारताने हल्ला करीत चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने फेटाळला आहे. मेजर जनरल आसिफ गफूर यांनी टिष्ट्वट केले आहे की, पाकिस्तानी चौक्या नष्ट केल्याचा भारताचा दावा खोटा आहे, तसेच नियंत्रणरेषेजवळ सामान्य नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावाही चुकीचा आहे.