बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी गायब झालेली; नौदलाने 21 दिवस घेतला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 03:36 PM2019-06-23T15:36:39+5:302019-06-23T15:48:24+5:30
पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते.
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर 12 दिवसांत भारतानेपाकिस्तानात एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. यानंतर लगेचच समुद्रात भारतीय नौदलाच्या हालचाली वेगवान झाल्या होत्या. भारताच्या काही युद्धनौकांनी पाकिस्तानकडे कूच केले होते. या घडामोडींचा खुलासा झाला आहे.
पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. याचा बदला भारताने लगेचच घेतला होता. यामुळे पाकिस्ताननेही दुसऱ्या दिवशी अमेरिकेने दिलेली एफ 16 विमाने भारतात घुसविली होती. यामध्ये पाकिस्तानचे एक विमान पाडले होते. तर पाकिस्तानचे हेलिकॉप्टर समजून भारतीय पायलटने भारताचेच हेलिकॉप्टर पाडले होते. यानंतर लगेचच भारतीय नौदल सतर्कतेच्या इशाऱ्यावर गेले होते. भारत-पाकिस्तान दरम्यान तेव्हा युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती.
या हवाई हल्ल्यानंतर भारतीय युद्धनौकांची हालचाल वाढली होती. यामागचे कारण आता समोर आले आहे. पाकिस्तानची सर्वाच आधुनिक अगोस्टा श्रेणीतील पाणबुडी पीएनएस साद ही पाकिस्तानी पाण्यातून अचानक गायब झाली होती, असे एका केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले आहे.
महत्वाचे म्हणजे ही पाणबुडी साधारण पाणबुड्यांपेक्षा वेगळी आहे. ती बराचकाळ हवा घेण्यासाठी वरती न येता पाण्याखाली राहू शकते. यामुळे ही पाणबुडी शेवटची दिसल्याचे ठिकाणावरून ती गुजरातच्या समुद्रात गेल्याचा अंदाज लावला जात होता. या ठिकाणापासून गुजरात दोन दिवसांवर आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई पाच दिवसांच्या अंतरावर होती. यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
आता नेव्हीचा स्ट्राइक?, भारताकडून अरबी समुद्रात युद्धनौका, पाणबुड्या अन् लढाऊ विमानं तैनात
यामुळे भारतीय नौदलाने तातडीने या पाणबुडीचा शोध सुरु केला. यासाठी पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि विमानांचा वापर करण्यात येत होता. या वेळात पाकिस्तानची पाणबुडी ज्या भागात जाण्याची शक्यता होती, तेथे कसून शोध घेतला जात होता. जर पीएनएस साद भारताच्या हद्दीत घुसली असती तर तिच्यावर समुद्राच्या तटावर आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रसंगी या पाणबुडीवर लष्करी कारवाईही करण्याची मुभा देण्यात आली होती, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
या साठी भारताची अण्वस्त्रांनी युक्त असलेली पाणबुडी आयएनएस चक्रलाही पाकिस्तानच्या समुद्री सीमेवर पाठविण्यात आले होते. तसेच स्कॉर्पिऑन श्रेणीतील आयएनएस कलावरीला पाणबुडीलाही सादच्या मागावर पाठविम्यात आले होते. शिवाय नौदलाने व्याप्ती वाढवत सॅटेलाईट आणि बोटींचीही मदत घेतली होती. हा शोध तब्बल 21 दिवस सुरु होता. ती अन्यत्र कुठेतरी लपविण्यात आली असावी असा निष्कर्ष काढण्यात आला. 21 दिवसांनंतर ही पाणबुडी पाकिस्तानच्या पश्चिमेकडे आढळून आली.
भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढल्यानंतर नौदलाने आयएनएस विक्रमादित्यसह तब्बल 60 युद्धनौका समुद्रात तैनात केल्या होत्या.