पाकिस्तानचे घुमजाव, भारताबरोबर चर्चेची तयारी
By Admin | Published: April 15, 2016 08:06 AM2016-04-15T08:06:32+5:302016-04-15T08:06:32+5:30
भारताबरोबर शांतता प्रकिया स्थगित करणा-या पाकिस्तानने आठवडयाभरातच आपल्या भूमिकेवरुन घुमजाव केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - भारताबरोबर शांतता प्रकिया स्थगित करणा-या पाकिस्तानने आठवडयाभरातच आपल्या भूमिकेवरुन घुमजाव केले आहे. भारताबरोबर चर्चेचे दरवाजे उघडे असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झाकारीया यांनी गुरुवारी सांगितले.
इस्लामाबादमध्ये पत्रकारपरिषदेत झाकारीया यांना भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर चर्चा हाच उत्तम पर्याय असून, चर्चेचे दरवाजे बंद झालेले नाहीत असे उत्तर त्यांनी दिले. आठवडयाभरापूर्वी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबरोबरची शांतता प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले होते.
डिप्लोमसी ही दोन देशांमधल्या संवादासाठी आहे. परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेसाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरु आहेत. कुठलाही पर्याय बंद करण्याचा विचार न करता आपण पुढे बघितले पाहिजे. दोन्ही देश परस्परांच्या संपर्कात आहेत असे नफीस झाकारीया यांनी सांगितले.
सात एप्रिलला नवी दिल्लीत अब्दुल बासित यांनी परराष्ट्र स्तरावरील कोणतीही चर्चा नियोजित नसून सध्या शांतता प्रक्रिया खंडीत करण्यात आली आहे असे सांगितले होते.