भारताच्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:11 AM2018-03-02T06:11:19+5:302018-03-02T06:11:19+5:30
जम्मू-काश्मिरमध्ये भिंबेर गली भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेपलीकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने गुरुवारी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले.
श्रीनगर/इस्लामाबाद : जम्मू-काश्मिरमध्ये भिंबेर गली भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेपलीकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने गुरुवारी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. पाकिस्ताननेही त्यांच्या दोन जवानांच्या मृत्यूस दुजोरा दिला. मात्र भारताकडून निष्कारण गोळीबार केल्याची आवई उठवली आहे. नौशेरा भागात पाकिस्तानच्या गोळीबारात एक भारतीय जखमी झाला आहे.
पाकिस्तानने गुरुवारी सकाळी पावणेनऊ वाजल्यापासून गोळीबाराला सुरुवात केली. भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात मुनीर चोहान, आमीर हुसेन हे दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले. नियंत्रण रेषेच्या जवळ पुंछ जिल्ह्यातील मेंढार परिसरातल्याा बालकोट व मानकोट भागात भारत व पाकिस्तानचे सैनिक परस्परांवर गोळीबार तसेच तोफमारा करीत आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली असून रहिवाशांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. गोळीबारात भारतीय हद्दीत जीवित वा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.
पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेपलीकडून केलेल्या गोळीबारात गुरुवारी पुंछ जिल्ह्यातील मानकोट भागात दोन भारतीय जवान जखमी झाले. हे दोन्ही जवान महार रेजिमेंटचे आहेत. गेल्या १४ जानेवारीपासून राजौरी व पुंछ जिल्ह्यातील
नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी सैन्याने सातत्याने गोळीबार चालविला आहे. त्यामुळे नौशेरा, आर. एस. पुरा,
कठुआ येथील सीमालगतच्या गावातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. त्याआधी २२ फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाल्यानंतर उरी भागातील आठ गावांतील रहिवाशांनीही सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत केले होते. (वृत्तसंस्था)
>चीनशी संघर्ष वाढणार
नवी दिल्ली:चीनशी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर संघर्षाचे प्रसंग वाढीला लागण्याची शक्यता आहे, अशी भीती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती संवेदनशील बनली आहे. दोन्ही देशांतील सैन्यामध्ये संघर्षाचे प्रसंग निर्माण होत आहेत. एका बाजूला दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु असून दुसºया बाजूस प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात येत आहे असे ते पुढे म्हणाले.
लष्कर व सेंटर फॉर लॅन्ड वेल्फेअर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भामरे बोलत होते.