पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं चोख प्रत्युत्तर
By admin | Published: September 30, 2016 12:51 PM2016-09-30T12:51:25+5:302016-09-30T12:51:25+5:30
पूंछ सेक्टरमधल्या शहापूरजवळ पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय ठिकाणांवर गोळीबार केल्याचं वृत्त आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 30 - पूंछ सेक्टरमधल्या शहापूरजवळ पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय ठिकाणांवर गोळीबार केल्याचं वृत्त आहे. भारतीय लष्कराच्या सूरणपूर या चौकीजवळच हा भाग असून भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार झाला. नियंत्रण रेषेनजीकच्या गावांमध्ये स्थानिकांच्या स्वसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्या लष्कराला पाकिस्तानी लष्कर व दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी मदत करत आहेत. आज, शुक्रवारीही पाकिस्ताननं केलेल्या या आगळिकीनंतर स्थानिक स्वसंरक्षण समित्या सतर्क झाल्या असून त्यांच्या सहाय्याने भारतीय लष्कराने प्रतिकारवाई सुरू केली आहे.
नियंत्रणरेषेनजीकच्या सगळ्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून भारतीय लष्कर कुठल्याही स्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलं.
भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून हालचाली सुरु झाल्याचं दिसत आहे. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या असून काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याचं कळत आहे. जसजशी वेळ सरकत आहे तसतसा तणाव वाढत चालला आहे.
आरएसपुरा, अरनिया या दोन सीमांवर पाकिस्तानची अॅक्शन टीम आणि लष्कराच्या हालचाली दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झालेल्या उरीजवळच्या सीमेवरही पाकिस्तानी सैन्याची तुकडी दिसल्याची माहिती मिळत आहे.