पाकिस्तानने सोशल मिडियाच्या माध्यमातून भारताविरोधात पुकारले युद्ध
By admin | Published: July 19, 2016 08:58 AM2016-07-19T08:58:13+5:302016-07-19T08:58:13+5:30
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वणीचा खात्मा करण्यात आल्यानंतर सोशल मिडियावर आलेल्या अर्ध्याहून अधिक प्रतिक्रिया कुठून आल्या आहेत याची काहीच माहिती मिळत नाही आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 19 - हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वणीचा खात्मा करण्यात आल्यानंतर सोशल मिडियावर आलेल्या अर्ध्याहून अधिक प्रतिक्रिया कुठून आल्या आहेत याची काहीच माहिती मिळत नाही आहे. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. 8 जुलै ते 14 जुलैदरम्यान ट्विटर, फेसबूक आणि अन्य सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आलेल्या एकूण 1.26 लाख प्रतिक्रियांच सर्वेक्षण करण्यात आलं. यातील 54,285 म्हणजे 45 टक्के ठिकाणांची माहिती मिळू शकलेली नाही.
सर्वेक्षणानुसार 49,159 म्हणजे 40 टक्के पोस्ट भारतातून करण्यात आल्या आहेत. तर 10,110 पोस्ट पाकिस्तानातून करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 'हा ट्रेंड चिंताजनक आहे, कारण यावरुन पाकिस्तान सायबर स्पेसच्या माध्यमातून प्रॉक्सी वॉर सुरु करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळत आहे. समस्या निर्माण व्हाव्यात यासाठी लोक सोशल मिडियावर ट्विट करत आहेत, कमेंट करत आहेत. मात्र त्यांची जबाबदारी काही नाही', असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितलं आहे.
सोशल मिडियावर पोस्ट करणारे आपलं लोकेशन स्विच ऑफ करत असावेत, जेणेकरुन त्यांना ट्रेस करणं शक्य होणार नाही असं अधिका-यांचं म्हणणं आहे. सरकारने जम्मू काश्मीरमध्ये टीव्ही, वृत्तपत्र आणि मिडियावर बंदी लावलेली असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात असतानाच हे सर्वेक्षण आलं आहे. बुरहान वणीला ठार मारण्यात आल्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने राज्यात इंटरनेट, केबल टीव्हीवरदेखील बंदी आणली आहे.
भारत आणि पाकिस्तानव्यतिरिक्त अन्य देशातूनही पोस्ट करण्यात आल्या आहेत अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. अमेरिकेतून 3246, युकेमधून 1463, युएईतून 849 पोस्ट करण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया 472, कॅनडा 406, सौदी अरब 402 आणि चीनमधून 394 पोस्ट करण्यात आल्या आहेत.
22 वर्षीय बुरहान वणी सोशल मिडियाच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाचा चेहरा बनला होता असं म्हटलं जातं. त्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. यामुळेच कदाचित तो मारला गेल्यानंतर सोशल मिडियावर लगेचच बु-हान वानी आणि पाकिस्तान स्टॅड वित काश्मीर हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला होता.
बुऱ्हानचा मृतदेह पाकच्या ध्वजात
सुरक्षा दलांनी बुऱ्हान वणीचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर दफनविधीसाठी त्राल या त्याच्या मूळ गावी आणण्यात आला. दफनविधीला गर्दी होऊ नये यासाठी हमरस्ते बंद करण्यात आले होते तरी हजारो लोक डोंगरवाटांनी व पायवाटांनी तेथे जमा झाले. १९९० च्या काश्मीर खोऱ्यातील उद्रेकानंतर पोलिसी कारवाईत मारल्या गेलेल्या कोणाही बंडखोराच्या अंत्ययात्रेस जमलेला हा सर्वात मोठा जनसमुदाय होता, असे मानले जात आहे.
विशेष म्हणजे काश्मीरच्या आझादीसाठी वयाच्या १५ व्या वर्षी हिजबूल मुजाहिदीनमध्ये सामील झालेल्या बुऱ्हानचा मृतदेह पाकच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आला होता. त्याशिवाय शेकडो लोक उघडपणे पाकिस्तानचा ध्वज फडकावित होते. ‘तुम कितने बुऱ्हान मारोंगे, हर घरसे बुऱ्हान निकलेगा’, अशा घोषणा देण्यात येत होत्या.