'हे' असणार देशातलं शंभरावं विमानतळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 10:18 AM2018-05-03T10:18:14+5:302018-05-03T10:18:14+5:30
देशांतर्गत वाहतुकीला चालना देण्यावर भर
नवी दिल्ली: लवकरच देशातील विमानतळांची संख्या शंभरवर जाणाराय. सिक्कीममधलं पाकयाँग विमानतळ जून महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. हे विमानतळ देशातलं शंभरावं विमानतळ ठरणाराय. स्पाईसजेट कंपनीला कोलकाता ते पाकयाँग दरम्यान विमान सेवा देण्याची परवानगी मिळालीय.
सध्या देशातील सर्व राज्यांमध्ये विमानतळ आहे. मात्र सिक्कीम त्याला अपवाद आहे. 'जूनमध्ये पाकयाँग विमानतळ कार्यान्वित होईल. त्यामुळे सिक्कीम हवाई मार्गानं देशाशी जोडलं जाईल,' असं सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितलं. देशांतर्गत हवाई वाहतूकसेवेला चालना देण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जातोय. याच योजनेचा भाग म्हणून देशभरातील विमानतळांची संख्या पंचवीसनं वाढवली जाणाराय.
मे/जून महिन्यापासून जमशेदपूर, दुर्गापूर, कुल्लू आणि पंतनगर इथून हवाई वाहतूक सुरू होईल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी ही माहिती दिलीय. याशिवाय 13 विमानतळांचं आधुनिकीकरण केलं जाणाराय. यामध्ये कानपूर, रौरकेला, बुर्नपूर, उत्केला, जेयपोरे या विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय 23 विमानतळांना हॅलिपॅड सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीय.