कोरोनाबाधित पत्नीला वाचवण्यासाठी पतीने खर्च केले 1.25 कोटी; अशी जिंकली मृत्यूशी लढाई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:57 IST2022-02-18T16:56:06+5:302022-02-18T16:57:13+5:30
Doctor saved Covid-19 infected wife’s life in Pali : कोरोनामुळे आजारी पडलेल्या पत्नीच्या उपचारासाठी डॉक्टर सुरेश चौधरी (Dr. Suresh Choudhary) यांनी आपली पदवी गहाण ठेवली. उपचारांसाठी जवळपास 1.25 कोटी रुपये खर्च केले.

कोरोनाबाधित पत्नीला वाचवण्यासाठी पतीने खर्च केले 1.25 कोटी; अशी जिंकली मृत्यूशी लढाई...
पाली : राजस्थानमधील (Rajasthan)एका व्यक्तीने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या पत्नीला जीवनाची भेट दिली. पाली येथील डॉक्टर सुरेश चौधरी यांनी पत्नीला वाचवण्याचा निर्धार केला होता. त्यांनी आपल्या पत्नीला मृत्यूच्या कचाट्यातून बाहेर आणले. सर्वस्व पणाला लावून त्यांनी आपल्या पत्नीचे प्राण वाचवले. कोरोनामुळे आजारी पडलेल्या पत्नीच्या उपचारासाठी डॉक्टर सुरेश चौधरी (Dr. Suresh Choudhary) यांनी आपली पदवी गहाण ठेवली. उपचारांसाठी जवळपास 1.25 कोटी रुपये खर्च केले.
दरम्यान, आज सर्वत्र या जोडप्याची जोरदार चर्चा होत आहे. सुरेश चौधरी हे पाली जिल्ह्यातील खैरवा गावचे रहिवासी आहेत. ते पत्नी अनिता आणि 5 वर्षांच्या मुलासोबत राहतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांच्या पत्नीची प्रकृती खालावली होती. त्यांना खूप ताप आला. टेस्ट केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर काही वेळाने त्यांची प्रकृती ढासळू लागली. अशा परिस्थितीत सुरेश यांनी आपल्या पत्नीसह बांगर हॉस्पिटल गाठले, मात्र तेथे त्यांना बेड मिळाला नाही. पत्नीची प्रकृती सतत खालावत चालली होती. त्यानंतर सुरेश हे पत्नीसह जोधपूर एम्समध्ये पोहोचले. याठिकाणी पत्नीला उपचारांसाठी दाखल केले.
पत्नीला वाचवण्यासाठी हार मानली नाही
सुरेश हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. ज्या वेळी त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडली, त्यावेळी कोरोनाचा कहर झाला होता. त्यांना सुट्या मिळत नव्हत्या. त्यानंतर ते आपल्या एका नातेवाईकाकडे पत्नीला सोडून पुन्हा ड्युटीवर गेले. दरम्यान, पत्नी अनिता यांची प्रकृती खूपच बिघडली आहे. त्यांचे फुफ्फुस 95 टक्के खराब झाले असून त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच, अनिता यांना वाचविणे खूप कठीण आहे, असे डॉक्टरांनी सांगितले होते. अशा परिस्थितीत सुद्धा सुरेश यांनी हार मानली नाही. त्यानंतर ते पत्नीसह अहमदाबादला गेले. 1 जून रोजी सुरेश यांनी अनिता यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपचारांसाठी दिवसाचा खर्च लाखों रुपये
अनिता यांचे कारण कोरोनामुळे वजन बरेच कमी झाले होते. त्यांच्या शरीरातही रक्ताची कमतरता होती. यानंतर डॉक्टरांनी त्यांना ईसीएमओ मशीनवर हलवले. या मशिनद्वारे त्यांचे हृदय आणि फुफ्फुसावर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. एका दिवसात या मशिनची किंमत एक लाख रुपयांहून अधिक असल्याचे सुरेश यांनी सांगितले. उपचारामुळे सुरेश यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला. पण कोणत्याही परिस्थितीत पत्नीला वाचवायचे आहे, असा विचार त्यांनी केला होता. अनिता या तब्बल 87 दिवस रुग्णालयात होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारू लागली आणि त्यांचे प्राण वाचले.
एमबीबीएसची पदवी गहाण ठेवली
दरम्यान, अनिता यांच्या उपचारासाठी पैसे उभे करायचे होते, म्हणून एमबीबीएसची पदवी गहाण ठेवून बँकेकडून 70 लाखांचे कर्ज घेतल्याचे सुरेश सांगतात. तसेच, स्वतःची बचत फक्त 10 लाख रुपये होती. याशिवाय, मित्र आणि सहकारी डॉक्टरांकडून 20 लाख रुपये घेतले. त्याचवेळी त्यांनी त्यांचा एक प्लॉट 15 लाख रुपयांना विकला. इतर नातेवाईकांकडूनही पैसे घेतल्याचे सुरेश यांनी सांगितले.