Palm Oil Price Hike: रिफाईन्ड तेलाच्या किंमती पुन्हा वाढणार; इंडोनेशियाने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 07:51 AM2022-01-22T07:51:35+5:302022-01-22T07:51:40+5:30
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींपासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आयात धोरणात बदल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाम तेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल यासारख्या तेलांनी आपण आपल्या गरजा भागवू. अमेरिका सोया तेलाचा प्रमुख निर्यातदार आहे.
केंद्र सरकारने वाढती महागाई कमी करण्यासाठी इंधनाबरोबरच खाद्यतेलाच्या किंमती देखील काही प्रमाणात कमी केल्या होत्या. परंतू हा दिलासा काही दिवसांपुरताच राहण्याची शक्यता आहे. किचन आणि उद्योगांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पाम तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारताला इंडोनेशियाकडून सर्वाधिक पाम तेलाचा पुरवठा होतो. मात्र, इंडोनेशियानेच पाम तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाम तेलाची आयात घटल्याने त्याचा थेट परिणाम बाजार आणि ग्राहकांवर होणार आहे. खाद्य तेल उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इंडोनेशियाने कमी पुरवठा केल्यास मलेशियाकडून हा पुरवठा भरून काढण्यात येईल. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मलेशियाकडून पाम तेल मिळणे अशक्य आहे. इंडोनेशियाने एका विधेयक आणले आहे, त्याद्वारे त्यांना तेथील किंमती खाली आणायच्या आहेत, यामुळे त्यांनी पाम तेलाची निर्यात घटविण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत इंडोनेशियामधून 60 टक्के पामतेल आयात करतो. त्यामुळेच इंडोनेशियातून कमी तेल आल्याचा थेट परिणाम भारतीय देशांतर्गत बाजार आणि ग्राहकांवर होणार आहे. भारत दरवर्षी आपल्या एकूण खाद्यतेलाच्या गरजेपैकी दोन तृतीयांश आयात करतो, जे सुमारे 15 दशलक्ष टन आहे. मलेशिया हा इंडोनेशियानंतरचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, जो भारताच्या पाम तेलाच्या वापरापैकी 40 टक्के निर्यात करतो.
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींपासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आयात धोरणात बदल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाम तेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल यासारख्या तेलांनी आपण आपल्या गरजा भागवू. अमेरिका सोया तेलाचा प्रमुख निर्यातदार आहे.