मोठा 'आधार'! पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यास मुदतवाढ; लाखो नागरिकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 08:42 PM2021-03-31T20:42:44+5:302021-03-31T20:56:32+5:30
पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ; अनेकांचा जीव भांड्यात पडला
नवी दिल्ली: आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. तशी घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आज आधार कार्ड आणि पॅन कार्ड करण्यासाठी अनेकांनी संकेतस्थळाला भेट दिली. संकेतस्थळावर मोठा भार आल्यानं ते बंद पडलं. त्यामुळे आता आधार आणि पॅन कार्ड करण्यास मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत आधार आणि पॅन लिंक न केलेल्यांना ३० जूनपर्यंत हे काम करता येईल. त्यामुळे लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Last date to link Aadhaar with PAN extended from March 31 to June 30)
Last date to link Aadhaar with PAN extended from March 31 to June 30.
— ANI (@ANI) March 31, 2021
आज करू, उद्या करू...! लेट लतीफांच्या आधार-पॅन लिकिंगसाठी उड्या पडल्या; आयकरची वेबसाईटच क्रॅश झाली
आधीच्या डेडलाईननुसार आधार-पॅनकार्ड लिंक (Aadhaar-PAN Linking) करण्याचा आज अखेरचा दिवस होता. यानंतर आधार-पॅन करायचं झाल्यास १००० रुपये भरावे लागणार होते. तसंच पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता होती. यामुळे आयकर विभागाच्या वेबसाईटवर (Income Tax Department) लेटलतीफांची मोठी गर्दी उसळली आहे. एकाचवेळी लाखोंच्या संख्येनं ट्रॅफिक आल्यानं आयकर विभागाची पॅन-आधार लिंक करण्याची लिंक क्रॅश झाली. त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला.
तुमचे आधार-पॅन कार्ड लिंक झाले का? असे करा काही मिनिटांत चेक...
आयकर भरण्याच्या शेवटच्या दिवशी जशी आज करू, उद्या करू म्हणत शेवटच्या दिवशी काम करणाऱ्यांची तारांबळ उडते तशी तारांबळ आज उडालेली दिसत होती. यामुळे अनेकांना सर्व्हर हँग झाल्याने अडचणींचा सामना करावा लागला. अनेकजण सारखे सारखे प्रयत्न करत होते. मात्र, तरीदेखील दोन्ही कार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण झाली नाही.
आयकर विभागाने आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार सूचना केली होती. गेल्या काही दिवसांपासून तशा बातम्याही सारख्या दिल्या जात होत्या. मात्र, तरीदेखील अनेकांनी लिंक केलं नसल्यानं त्यांच्या आजच्या एकाच दिवशी आयकर विभागाच्या वेबसाईटवर उड्या पडल्या. एकीकडे साईट क्रॅश झालेली असताना दुसरीकडे बँकांचे मेसेज ग्राहकांना टेन्शन देत होते. सोशल मीडियावर आयकरची लिंक बंद पडल्याच्या तक्रारी दिसत होत्या.