पंचायत निवडणुका पुढे ढकला, मुख्यमंत्री शिंदे आयोगाला करणार विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 03:31 AM2022-07-10T03:31:16+5:302022-07-10T03:31:51+5:30
दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार मंत्रिमंडळ विस्तार.
नवी दिल्ली : पावसाळा असल्याने राज्यात पंचायत निवडणुका घेण्यात प्रशासनाला अडचणी येऊ शकतात, तसेच हा शेतीचा हंगाम असल्याने पंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
राज्यातील पंचायत निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्या, या मताचा मी आहे. या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी राज्याची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडावी, यासाठी विनंती केली आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या मंत्रिमंडळात कोण राहील, यावर या भेटीत चर्चा झाली नाही. आषाढी एकादशीनंतर सर्वांशी चर्चा करून विस्तार होईल.
खासदारांशी भेट नाही
शिवसेनेचे काही खासदार भेटल्याचा इन्कार करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मतदारसंघातील कामाच्या संदर्भात काहीजण भेटले असतील. परंतु याशिवाय कोणत्याही उद्देशाने खासदार भेटलेले नाही.
घटनाविरोधी काम नाही
शिवसेनेचे ४० आमदार आमच्या बाजूने आहेत. आम्ही गैरकृत्य केलेले नाही. आमदारांना मिळालेली अपात्रता नोटीस व प्रतोदाच्या नियुक्तीबद्दल सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकार मजबूत
माझ्या नेतृत्वातील सरकार मजबूत आहे. नव्याने निवडणुका घेण्याचा प्रश्नच नाही. आमच्याकडे १६४, तर विरोधी बाजूला ९९ आमदार आहेत. हे सरकार संपूर्ण अडीच वर्षे व पुढेही येईल.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
शिंदे माझे नेते
पक्षाने मला भरपूर काही दिलेले आहे. परंतु पक्षाची जी आवश्यकता असते. त्यानुसार आदेश पाळावे लागतात. मुख्यमंत्रीच सरकारचे नेते असतात. एकनाथ शिंदे हे माझे नेते आहेत.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री