पंचायत समितीवर भारिप बमसंचा झेंडा कायम
By admin | Published: June 28, 2016 11:00 PM2016-06-28T23:00:11+5:302016-06-28T23:29:34+5:30
लोकमतचे भाकीत खरे ठरले; भाजपा तोंडघशी.
पातूर(जि. अकोला): पातूर पंचायत समिती येथे आज सभापती, उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. सभापती पद महिला अनुसूचित जातीकरीता राखीव असल्याने तथा भारिपकडे राखीव प्रवर्गाच्या महिला उमेदवार नसतानासुद्धा फोडाफोडीच्या राजकारणातून भारिपने सविता सिद्धार्थ धाडसे यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ टाकल्याने भाजपकडे उमेदवार असूनसुद्धा त्यांना सत्ता काबीज करता न आल्याने भाजपास तोंडघशी पडावे लागले. सभापती पदाकरिता नामनिर्देशन अर्ज भारिपकडून सविता सिद्धार्थ धाडसे यांचा तर भाजपाकडून अपर्णा संदीप इंगळे यांचा अर्ज दाखल झाला. सविता धाडसे यांना ८ तर अपर्णा इंगळे यांना केवळ दोनच मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. लोकमतने २४ जून रोजीच भारिप बमसं फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापन करणार असल्याचे भाकीत वर्तविले होते. ते भाकीत आज तंतोतंत खरे ठरले. उपसभापतीपदी नईमाबानो शे. मोबीन यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजेश वझिरे यांनी नवनियुक्तांच्या नावांची घोषणा करताच पंचायत समिती परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी नवनियुक्तांनी धुमधडाक्यात मिरवणूक काढीत पंचायत समिती, बाळापूर रोड येथून मिलिंद नगर येथे बुद्ध विहारामध्ये जाऊन दर्शन घेतले. यावेळी नवनियुक्त सभापती, उपसभापतीचे भारिपचे तालुकाध्यक्ष ॲड. किरण सरदार, प्रसिद्धी प्रमुख सम्राट तायडे, जीवन उपर्वट, हिरासिंग राठोड, दीपक इंगळे अरुण कचाले, धर्माजी सुरवाडे, विश्वास खुळे, तोताराम कापकर, दिनेश गवई, मनोज गवई, भारत चिकटे, नागेश करवते, चंद्रमणी वानखडे, भारत वानखडे, देवराव अंभोरे, शे. हनिफभाई, चांदभाई, विजय सुरवाडे, मुकेश किरतकार आदींची उपस्थिती होती.