फ्री फ्री फ्री ची घोषणा करा अन् नंतर पंतप्रधानांसमोर कटोरा घेऊन उभे राहा; भगवंत मान यांच्यावर बरसले हरयाणाचे CM
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 15:39 IST2022-03-30T15:38:20+5:302022-03-30T15:39:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अलीकडेच दोन वर्षांसाठी पॅकेज देण्याची मागणी केली.

फ्री फ्री फ्री ची घोषणा करा अन् नंतर पंतप्रधानांसमोर कटोरा घेऊन उभे राहा; भगवंत मान यांच्यावर बरसले हरयाणाचे CM
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी अलीकडेच दोन वर्षांसाठी पॅकेज देण्याची मागणी केली. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी मोफत आश्वासने देण्याच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. यावरून त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Arving Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना टोलाही लगावला. निवडणुकीपूर्वी सर्व काही मोफत वाटण्याची आश्वासने द्या आणि नंतर ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटोरा घेऊन पंतप्रधानांसमोर उभे राहा. हे कोणतं राजकारण?, असा सवाल त्यांनी केला.
"भाजप समाजातील सर्वात अखेरच्या व्यक्तीलाही संपन्न करण्यासाठी काम करत आहे. परंतु आम्ही मोफत देण्याच्या बाजूनं नाही," अस खट्टर म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना खट्टर यांनी मान यांना टोला लगावला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यादरम्यान त्यांनी राज्यासाठी आर्थिक मदत मागितली होती.
"पंजाबची आर्थिक परिस्थिती बिकट"
"पंजाबची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. पंजाबकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठीही पैसे नाहीत. वेतन देण्यासाठी ते कर्जावर कर्ज घेत आहेत. याचा विचारही न करता आम आदमी पक्षानं लोकांना सर्वकाही मोफत देण्याची आश्वासानं दिली. आता आपली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी खजान्यात पैसे सापडले नाही, तर ते कटोरा घेऊन पंतप्रधानांकजे गेले," असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
"आपल्या हिंमतीवर करा"
"तुमचं धोरण काही मोफत देण्याचं असेल, तर द्या, परंतु ते आपल्या हिंमतीवर करा. केंद्राकडे पैसे मागून मोफत देण्याचं राजकारण करणं नींदनीय आहे. मोफतच्या घोषणा करून नंतर कटोरा घेऊन पंतप्रधानांसमोर जाणं ही चांगली बाब नाही. यामुळे देश आणि समाजाचं भलं होणार नाही," असंही खट्टर म्हणाले.