पंचकुंडी कामधेनू गायत्री यज्ञाने वसूबारस उत्साहात
By admin | Published: October 26, 2016 11:54 PM2016-10-26T23:54:32+5:302016-10-26T23:55:16+5:30
पंचकुंडी कामधेनू गायत्री यज्ञाने वसूबारस उत्साहात
नाशिक : गो माता की जय! असे म्हणत बुधवारी (दि.२६) शहरात ठिकठिकाणी गोवत्स पूजन मोठ्या उत्साहात पार पाडले. आश्विन वद्य द्वादशी अर्थात वसूबारस यादिवशी दिवसभर उपवास करून शहरातील पांजरापोळ तसेच विविध गोशाळांमध्ये महिलांनी संध्याकाळी गर्दी करत गाय आणि वासराची पारंपरिक पद्धतीने पूजा करून गायीला नैवेद्य अर्पण केला.
दीपावली सणाची सुरुवात वसूबारस या दिवसापासून होत असल्याने बुधवारी रात्री शहर परिसर पणत्या आणि आकाशकंदिलांनी उजळून निघाला होता. आकर्षक आणि नक्षीदार रांगोळ्यांनी दीपावलीचे शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले.
शहराची वाढ होत असताना अनेक गोठे नामशेष होऊ लागले आहेत. त्यामुळे आज शहरातील नागरिकांनी पंचवटी येथील पांजरापोळ, तिडके कॉलनी येथील गुरुगंगेश्वर वेदमंदिर आश्रम, तपोवन येथील कृषी गो-सेवा ट्रस्ट, दिंडोरी येथील नंदिनी गोशाळा तसेच परिसरातील विविध गोशाळांमध्ये जाऊन गाय आणि वासराची विधिवत पूजा केली.
दिंडोरीरोड येथील नंदिनी गोशाळा येथे गोवत्स पूजनानिमित्त बेवारस गायींची काळजी घेणाऱ्या तसेच गायीची सेवा करणाऱ्या सेवकांना उज्ज्वल भविष्य लाभावे, तसेच देशभरात ठिकठिकाणी सुरू असलेली गोवंश हत्त्या थांबावी यासाठी ‘पंचकुंडी कामधेनू गायत्री यज्ञ’ करण्यात आला. यावेळी ५०० हून अधिक भाविकांनी नंदिनी गोशाळेला भेट देऊन गोवत्साची मनोभावे पूजा केली.