Jammu and Kashmir : पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती - अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 06:50 PM2019-08-06T18:50:42+5:302019-08-06T18:58:04+5:30
काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यानंतर मंगळवारी कलम 370 वर लोकसभेत वादळी चर्चा सुरु झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर देताना पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती झाल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली.
जम्मू-काश्मीरचा मुद्दा पंडित जवाहरलाल नेहरू संयुक्त राष्ट्र संघात नेला. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 मर्यादित काळासाठी असल्याचे सांगितले. मात्र, ते हटवण्यासाठी 70 वर्षे लागली. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीर भारतापासून दूर होते. आता कलम 370 हटविल्यामुळे काश्मीरबद्दल सर्व अधिकार संसदेला असणार आहेत. तसेच, कलम 371 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नाही. कारण, कलम 370 आणि कलम 371 यांच्यातील फरक जनतेला माहीत आहे. कलम 370च्या आधारे पाकिस्तानकडून फुटीरतावादी चळवळीला खतपाणी घाल्यात येत आहे, अमित शहा यांनी सांगितले.
Amit Shah in Lok Sabha: Who took Kashmir to the United Nations, it was Pandit Jawaharlal Nehru. History will decide if this decision (to revoke 370) is right or not, but whenever it will be discussed, PM Narendra Modi will be remembered by the people pic.twitter.com/MZGbkK9NqB
— ANI (@ANI) August 6, 2019
पाकधार्जिण्यांसोबत चर्चा कशासाठी करायची, असा सवाल करत अमित शहा म्हणाले, काश्मीर खोऱ्यातील जनता आपली आहे. त्यांच्याशी आम्ही कायम संवाद राहणार आहोत. काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे. कायदा, सुव्यवस्था कायम राखण्यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. तसेच, येथील जनतेची दिशाभूल करणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडू, असे अमित शहा म्हणाले.
Home Minister Amit Shah in Lok Sabha: The curfew wasn't put in place because the law and order situation has deteriorated. It is precautionary, it has been put in place so the situation doesn't deteriorate. #Article370#JammuAndKashmirpic.twitter.com/sMk85AVKOq
— ANI (@ANI) August 6, 2019
कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरमधील आदिवासी, दलित आरक्षणापासून वंचित राहिले. तसेच, या कलम 370मुळे बालविवाह विरोधी कायदा लागू नाही. त्यामुळे हे कलम हटविणे गरजेचे आहे. याशिवाय, लडाखला स्वतंत्र राज्य करण्याची स्थानिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यामुळे लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.
कलम 370 मुळे जम्मू- काश्मीरमधील युवकांना रोजगार मिळाले का? शिक्षण, आरोग्य मिळाले का? असा सवाल अमित शहा यांनी केला. तसेच, 370 हटविल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील युवकांचे भले होईल. काश्मीरच्या पर्यावरणाची योग्य ती काळजी घेण्यात येईल. पृथ्वीवरचा स्वर्ग ही काश्मीरची ओळख कायम ठेवू, असे आश्वासनही अमित शहा यांनी लोकसभेत दिले.