Pandora Papers Leak : सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर यांच्या नावे होती BVI कंपनी; पनामा लीकनंतर गाशा गुंडाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 11:35 AM2021-10-04T11:35:26+5:302021-10-04T11:37:28+5:30
यामध्ये अंजली तेंडुलकर यांच्या वडिलांच्याही नावाचा समावेश. सचिन तेंडुलकरच्या वकिलांनी हा दावा फेटाळला.
पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर (Panama Paper) लीकनं जगभरातील अनेकाना मोठा धक्का दिला होता. या पेपर लीकमधून अनेक बड्या व्यक्तींच्या बनावट कंपन्या आणि कर चोरीची प्रकरणं समोर आली होती. परंतु आता पुन्हाएकदा ICIJ नं (इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट) आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. याचा पर्दाफाश केल्यानंतर भारतातील बड्या व्यक्तींनी त्यावर तोडगा काढण्यास सुरूवात केली होती. यामध्ये देशातील काही बड्या व्यक्तींचीही नावं आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि तिचे वडिल आनंद मेहता यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
पंडोरा पेपर्सचा भाग असलेल्या पनामा लॉ फर्म अल्कोगलच्या रेकॉर्डच्या तपासणीनुसार सचिन, पत्नी अंजली तेंडुलकर आणि सासरे आनंद मेहता यांचा बीव्हीआय-आधारित कंपनी सास इंटरनॅशनल लिमिटेडचे बीओ आणि संचालक म्हणून नावं आहेत. डेटा पनामायन लॉ फर्म, अल्कोगलच्या कागदपत्रांचा भाग आहे, त्यांच्या कंपनीला एलजे मॅनेजमेंट (Suisse) द्वारे समाविष्ट करण्यात आलं आहे.
पँडोरा रेकॉर्डमध्ये सासचा पहिला संदर्भ २००७ चा आहे आणि कंपनीच्या मालकांना आर्थिक फायद्यांसह कागदपत्रांचा सर्वात तपशीलवार संच जुलै २०१६ मध्ये कंपनीच्या लिक्विडेशनच्या वेळेपासून उपलब्ध आहे. कंपनीच्या लिक्विडेशनच्या वेळी, सूचीबद्ध शेअर्सनुसार त्याचे समभाग भागधारकांनी परत खरेदी केले होते. यामध्ये सचिन तेंडुलकडे (९ शेअर्स) ८,५६,७०२ डॉलर्स, अंजली तेंडुलकर १४ शेअर्स किंमत १३,७५,७१४ डॉलर्स, आनंद मेहता ५ शेअर्स किंमत ४,५३,०८२ डॉलर्स.
अशा प्रकारे, सास इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअर्सची सरासरी बायबॅक किंमत सुमारे ९६ हजार डॉलर्स आहे आणि कंपनीच्या १० ऑगस्ट २००७ च्या (कंपनीची स्थापना झाली त्या दिवशी) ठरावाप्रमाणे, कंपनीचे ९० शेअर्स सुरुवातीला जारी केले गेले, असं इंडियन एक्स्प्रेसनं नमूद केलं आहे.
वकिलांनी दावा फेटाळला
या सगळ्या प्रकारानंतर सचिन तेंडुलकरच्या वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर यांची सर्व गुंतवणूक वैध मार्गाने केलेली आहे. आयकर विभागाला याविषयी माहिती देण्यात आली होती, असे वकिलांकडून सांगण्यात आले.