पनीरसेल्वम यांना एआयएडीएमकेच्या आणखी 11 आमदारांचा पाठिंबा
By admin | Published: February 12, 2017 01:42 PM2017-02-12T13:42:55+5:302017-02-12T16:30:44+5:30
तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात दिवसेंदिवस पनीरसेल्वम यांची बाजू भक्कम होताना दिसत आहे.
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 12 - तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात दिवसेंदिवस पनीरसेल्वम यांची बाजू भक्कम होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शशिकला यांना पाठिंबा देणारे बरेचशे आमदार आणि खासदार पनीरसेल्वम यांच्या गोटात येऊन त्यांना पाठिंबा जाहीर करत आहेत. त्यामुळे शशिकला काहीशा अस्वस्थ आहेत. आता शशिकलांच्या तंबूतील जवळपास 11 आमदार आणि आणखी तीन खासदार पनीरसेल्वम यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. जयसिंग त्यागराज नट्टेरजी, सेनगुट्टूवन आणि आर. पी. मरुथराजा या खासदारांनी पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिला असून, कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावाखातरच हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पनीरसेल्वम यांच्या बाजूने सध्या 18 आमदार आणि 10 खासदार आहेत. त्यामुळे शशिकला यांना सरकार स्थापन करता येणार नाही.
तामिळनाडू राज्याचे शिक्षणमंत्री के. पंडिराजन यांनी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यापूर्वीच एआयएडीएमकेचे चार खासदार पी. आर. सुंदरम, के. अशोक कुमार, व्ही सत्यबामा आणि वनरोजा यांनी पनीरसेल्वम यांना समर्थन दिलं आहे. एआयएडीएमके पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभेत जवळपास 50 खासदार आहेत. त्यापैकी बहुतांश खासदार पनीरसेल्वम यांच्या गोटात दाखल झाले आहेत. पनीरसेल्वम यांची तरुणांमध्ये लोकप्रियता वाढत आहे.
तत्पूर्वी पनीरसेल्वम यांनी शशिकलांच्या दबावाखाली मुख्यमंत्रिपद सोडले होते. त्यावेळी शशिकलांनी पक्षांच्या आमदारांची तातडीने बैठक बोलावली. त्यानंतर शशिकला यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली गेली. मात्र दोन दिवसांनी शशिकला यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे ओ. पन्नीरसेल्वम यांनी मौन सोडून त्यांच्यावर गंभीर आरोप केले. राजीनाम्यासाठी माझ्यावर दबाव आणला, असे त्यांनी जनतेसमोर सांगितले. त्यानंतर शशिकला यांनी जयललिता यांचा विश्वासघात केला होता. शशिकला या सत्तेसाठी कट कारस्थाने रचत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी शशिकला यांच्यावर केला आहे. त्यामुळे एआयएडीएमके हा पक्ष शशिकला आणि पन्नीरसेल्वम अशा दोन गटांत विभागला गेला आहे. पक्षात कोणाचे वर्चस्व राहील हे येता काळच ठरवणार आहे.