काय म्हणता चक्क 'पाणीपुरी'वर बंदी!, काठमांडूमध्ये निर्णय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 10:46 AM2022-06-27T10:46:19+5:302022-06-27T10:47:10+5:30
नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात ललितपूर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये (LMC) पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कारण या परिसरात कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
नवी दिल्ली-
नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात ललितपूर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये (LMC) पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कारण या परिसरात कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत कॉलराचे १२ रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारपासून पाणीपुरीच्या विक्री आणि पुरवठ्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शहर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार संबंधित परिसरात पाणीपुरीच्या पाण्यातूनच कॉलराचे विषाणू पसरले आहेत. तसे नमूने देखील सापडले आहेत.
नगर पोलीस प्रमुख सीताराम हचेथु यांच्या माहितीनुसार शहरात गर्दीच्या ठिकाणी आणि कॉरिडोअर क्षेत्रात पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तशा सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. परिसरात कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानं तसा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वास्थ आणि जनसंख्या मंत्रालयाच्या माहितीनुसार काठमांडूमध्ये एकाच दिवशी सात कॉलराचे रुग्ण आढळून आले आहेत. आता एकूण १२ रुग्ण झाले आहेत. रुग्णांवर टेकू येथील सुकरराज ट्रॉपिकल अँड इंफेक्शियनस डिसीज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसंच कॉलराची कोणतीही लक्षणं आढळून आल्यास तातडीनं चाचणी करुन घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कॉलरासोबतच डायरिया आणि इतर आजारांपासून विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.