बसमध्ये पॅनिक बटन सक्तीचे !
By Admin | Published: May 26, 2016 04:24 AM2016-05-26T04:24:01+5:302016-05-26T04:24:01+5:30
महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये ‘पॅनिक बटन’, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहनाचा शोध घेणारे उपकरण लावणे बंधनकारक करण्यात येईल
नवी दिल्ली : महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये ‘पॅनिक बटन’, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहनाचा शोध घेणारे उपकरण लावणे बंधनकारक करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली. या संदर्भात सरकार येत्या २ जून रोजी अधिसूचना जारी करणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
‘निर्भयाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सर्व सार्वजनिक बसगाड्यांमध्ये आपत्कालीन पॅनिक बटन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस उपकरण लावणे अनिवार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे’, असे गडकरी म्हणाले.
नवी दिल्ली येथे राजस्थान सरकारच्या एका पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ केल्यानंतर गडकरी पत्रकारांशी बोलत होते. या प्रकल्पांतर्गत राजस्थान राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपत्कालीन बटन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेल्या आपल्या दहा लक्झरी बसगाड्या व दहा सामान्य बसगाड्यांचे परिचालन करेल. या यंत्रणेची निगराणी स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षातून केली जाईल. (वृत्तसंस्था)
पोलिसांची असेल नजर!
कोणत्याही अप्रिय घटनेपूर्वी महिला प्रवासी हे पॅनिक बटन दाबून पोलिसांना सतर्क करू शकतील. तसेच जीपीएसद्वारे स्थानिक पोलीस ठाण्याला माहितीचे आदानप्रदान होईल, अशीही सोय करण्यात येईल. एकदा आपत्कालीन संकेत जारी झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे बसमधील लाइव्ह फुटेज केंद्रीय नियंत्रण कक्षात प्रदर्शित होईल. तरीही वाहन निर्धारित मार्गावरून अन्य मार्गाने चालू लागले तर त्याची जीपीएसद्वारे निगराणी केली जाईल.
- नितीन गडकरी