नोटा मोजण्याचं मशीन...; भाजपा नेत्याच्या घरावर १८ तास चाललेल्या ईडीच्या छाप्यात काय सापडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 19:46 IST2025-02-14T19:44:53+5:302025-02-14T19:46:23+5:30
भाजपा नेते नितीसेन भाटिया यांच्या मॉडेल टाऊन येथील घरावर ईडीने छापा टाकला.

नोटा मोजण्याचं मशीन...; भाजपा नेत्याच्या घरावर १८ तास चाललेल्या ईडीच्या छाप्यात काय सापडलं?
हरियाणातील पानिपत येथील भाजपा नेते नितीसेन भाटिया यांच्या मॉडेल टाऊन येथील घरावर ईडीने छापा टाकला. मध्यरात्रीनंतर ही चौकशी पूर्ण झाली. तब्बल १८ तासांनंतर ईडीच्या पथकाने भाटिया यांच्या घरातून एक सीलबंद बॉक्स आणि एक बॅग ताब्यात घेतली. घरातून काय जप्त करण्यात आलं याबद्दल टीमने कोणतीही माहिती दिली नाही. माजी खासदार संजय भाटिया म्हणाले की, कुटुंबाला याचा कोणताही त्रास झालेला नाही. यावेळी अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याचं मशीनही सोबत आणलं होतं.
सूत्रांचा दावा आहे की, ही कारवाई नितीसेन भाटिया यांचा मोठा मुलगा नीरज भाटिया याच्या प्रकरणाशी जोडलेली आहे, ज्याला यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये कोडीन बेस सिरप विकल्याबद्दल आणि बेकायदेशीर मालमत्ता खरेदी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या जमिनीबाबत हिमाचल प्रदेशच्या सिरमौर उपायुक्तांकडूनही अहवाल मागवण्यात आला आहे.
नितीसेन भाटिया हे १९९५ ते २००१ पर्यंत प्रादेशिक संघटन मंत्री होते आणि ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष देखील राहिले आहेत. नितीसेन भाटिया यांचा दुसरा मुलगा हा पानिपत महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. जम्मू आणि काश्मीर एनसीबीने गेल्या वर्षी कोडीन सिरपचं प्रकरण पकडलं होतं. पथकाने ३३.९८० किलो कोडीन-बेसकफ सिरप, ९०० अल्प्रोझोलम गोळ्या, ५६ ट्रॅमेट्रोल कॅप्सूल, २१० लोराझेपाम गोळ्या, ५७० क्लोबाझम गोळ्या आणि सुमारे १५ लाख रुपये रोख जप्त केले.
या प्रकरणात नितीसेन भाटिया यांचा मुलगा नीरज भाटिया याला अटक करण्यात आली. तो हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील औषध उत्पादक संघटनेचा अध्यक्ष होता. तपासात असं आढळून आलं की,कोडीन सिरप भाटिया यांच्या स्वतःच्या पांवटा साहिब येथील फर्ममधून विकलं जात होतं. हे मनी लाँड्रिंगचे प्रकरण असल्याचं समोर आल्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. यासोबतच ईडीने ७ डिसेंबर २०२४ रोजी सिरमौरच्या उपायुक्तांना पत्र लिहून कंपनीच्या मालमत्तेची आणि तिच्याशी संबंधित लोकांची माहिती मागितली होती.