पंकजा, मुनगंटीवार, गडकरी, गोयल लोकसभेच्या रिंगणात; भाजपच्या दुसऱ्या यादीत राज्यातील २० जण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:59 AM2024-03-14T05:59:45+5:302024-03-14T06:01:25+5:30

सात नव्या चेहऱ्यांना संधी, पाच केंद्रीय मंत्र्यांना संधी, पाच महिलांना संधी.

pankaja munde sudhir mungantiwar nitin gadkari piyush goyal in lok sabha arena 20 people from the state in the second list of bjp | पंकजा, मुनगंटीवार, गडकरी, गोयल लोकसभेच्या रिंगणात; भाजपच्या दुसऱ्या यादीत राज्यातील २० जण

पंकजा, मुनगंटीवार, गडकरी, गोयल लोकसभेच्या रिंगणात; भाजपच्या दुसऱ्या यादीत राज्यातील २० जण

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केली. त्यात १२ खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले, तर सात नव्या चेहऱ्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरविले आहे. त्यात राज्यातील चार विद्यमान केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.   भाजपने बुधवारी सायंकाळी १० राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. 

भाजपने २ मार्च रोजी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आजच्या ७२ उमेदवारांसह भाजपने आतापर्यंत २६७ उमेदवारांची घोषणा केली आहे. 

राज्यातील २० उमेदवार 

डॉ. हिना गावित (नंदुरबार), डॉ. सुभाष भामरे (धुळे), स्मिता वाघ (जळगाव), रक्षा खडसे (रावेर), अनुप धोत्रे (अकोला), रामदास तडस (वर्धा), नितीन गडकरी (नागपूर), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), प्रतापराव पाटील चिखलीकर (नांदेड), रावसाहेब दानवे (जालना), डॉ. भारती पवार (दिंडोरी), कपिल पाटील (भिवंडी), पीयूष गोयल (उत्तर मुंबई), मिहीर कोटेचा (उत्तर पूर्व मुंबई), मुरलीधर मोहोळ (पुणे), डॉ. सुजय विखे पाटील (अहमदनगर), पंकजा मुंडे (बीड), सुधाकर श्रृंगारे (लातूर), रणजितसिंह नाईक निंबाळकर (माढा), संजयकाका पाटील (सांगली).

पाच केंद्रीय मंत्र्यांना संधी

नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील

पाच महिलांना संधी

पंकजा मुंडे, डॉ. भारती पवार, डॉ. हिना गावित, रक्षा खडसे, स्मिता वाघ. 

बहिणीच्या जागी बहीण, वडिलांच्या जागी मुलगा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देताना, त्यांच्या भगिनी व विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना संधी नाकारण्यात आली. २०१९ मधील विधानसभेच्या पराभवानंतर आता पंकजा पुन्हा एकदा मैदानात असतील. प्रीतम यांच्या जागी पंकजा यांना उमेदवारी दिली जाईल, असे वृत्त ‘लोकमत’ने २९ फेब्रुवारीच्या अंकात दिले होते. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा त्यांचे चुलत बंधू व विद्यमान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतून पराभव केला होता. धनंजय मुंडे महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत आणि आता ते पंकजा यांच्या विजयासाठी झटताना दिसतील. प्रकृतीमुळे सक्रिय नसलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याऐवजी अकोला येथे त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना संधी मिळाली. संजय धोत्रे यांचे भाचे व आमदार रणधीर सावरकर यांचीही चर्चा होती.  

कोणत्या मतदारसंघात बदलले उमेदवार

मतदारसंघ     मागील उमेदवार    नवीन उमेदवार

जळगाव    उमेश पाटील    स्मिता वाघ
अकोला    संजय धोत्रे    अनुप धोत्रे
चंद्रपूर    हंसराज अहिर    सुधीर मुनगंटीवार
उत्तर मुंबई    गोपाळ शेट्टी    पीयूष गोयल
उत्तर पूर्व मुंबई     मनोज कोटक      मिहीर कोटेचा
बीड                 प्रीतम मुंडे           पंकजा मुंडे

शिवसेनेने लढविलेल्या २३ जागांवर उमेदवार नाही

२०१९ मध्ये शिवसेनेने ज्या २३ जागा लढवल्या होत्या, त्यातील एकाही उमेदवाराची घोषणा भाजपने आज केलेली नाही. महायुतीच्या फॉर्म्युल्यानंतर त्यातील कोणत्या जागा भाजपला मिळतील हे निश्चित होईल.

 

Web Title: pankaja munde sudhir mungantiwar nitin gadkari piyush goyal in lok sabha arena 20 people from the state in the second list of bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.