पंतप्रधानांची 'मन की बात' आता शब्द रूपातही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 02:20 PM2017-07-30T14:20:49+5:302017-07-30T14:21:06+5:30

pantaparadhaanaancai-mana-kai-baata-ataa-sabada-rauupaatahai | पंतप्रधानांची 'मन की बात' आता शब्द रूपातही

पंतप्रधानांची 'मन की बात' आता शब्द रूपातही

Next

मुंबई, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवर महिना अखेरला प्रसारित होणारा मन की बात कार्यक्रम आता शब्द रुपात उपलब्ध झाला आहे
काल शनिवारी मुंबईतील राजभवनात मन की बात या पुस्तकाचा अनावरण सोहळा पार पडला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनचे संस्थापक संचालक हितेश जैन आदी उपस्थित होते. देशातील सर्वात जुनं मात्र आजही प्रभावी असलेल्या रेडिओ या माध्यमाद्वारे या उपक्रमाची सुरूवात झाली असली तरी आज टिव्ही, मोबाईल, इंटरनेट या सर्व माध्यमांवर मन की बात उपलब्ध आहे.

स्वातंत्र्य सैनिकांनी रेडिओच्या माध्यमाचा वापर जनतेपर्यंत विचार पोहोचविण्यासाठी केला होता. आज दूरचित्रवाणी क्रांतीप्रमाणेच प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांशी संवाद साधण्यासाठी रेडिओसारखे माध्यम वापरुन 'मन की बात' द्वारे शिक्षण, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ भारत, बेटी बचाओ अभियान, महिला सक्षमीकरण आदी अनेक क्षेत्रात लोकांच्याच कल्पनांना आकार देत लोकसहभागाचा अद्वितीय संवाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला आहे, असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केले.

मोदींच्या काही क्रांतिकारी कल्पनांनी लोकांच्या मनात, विशेषतः मुले आणि युवकांच्या मनावर सामाजिक कार्य करण्यासाठी खोल परिणाम केला आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, मन की बातच्या माध्यमातून मोदींनी लावलेले क्रांतिचे बीज येत्या कालावधीत फळ देईल. यासाठी केंद्र व राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे आणि कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) यांना समाजहिताच्या कामात गुंतवावे लागेल आणि बांधिलकीने काम करावे लागेल. यावेळी राज्यपालांनी राजभवनची इमारत दिव्यांग-सुलभ बनविण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानुसार राजभवनमधील इमारतींमध्ये दिव्यांगांना प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प बनविण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री मोदी हे समाजाला प्रेरित करू शकतात ही त्यांना मोठी देणगी आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजात चांगले काम करण्याची इच्छा असलेले अनेक लोक आहेत; मात्र त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. प्रधानमंत्र्यांनी 'मन की बात' द्वारे लाखो लोकांना प्रेरित करण्याचे काम केले. 'मन की बात' हे केवळ प्रधानमंत्र्यांच्या मनातील विचार नसून सर्वसामान्यांच्या मनातील विचार आहेत. 'मन की बात' पूर्ण भारताला संमोहित करतेच; मात्र आगामी काळात संवाद मुत्सद्दी असणाऱ्या व्यक्तींनाही आपली संवादाची दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शन करणारी आहे. 

Web Title: pantaparadhaanaancai-mana-kai-baata-ataa-sabada-rauupaatahai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.