"प्लीज पप्पा परत या"; शहीद जवानाच्या लेकीची आर्त साद; पत्नी-मुलीची अवस्था पाहून पाणवतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 01:58 PM2023-05-08T13:58:23+5:302023-05-08T14:10:10+5:30
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील घनदाट जंगलातील कंडी भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये नीलम सिंह यांचा समावेश होता.
राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले. यामध्ये नीलम सिंह हे देखील होते. नीलम सिंह यांचे पार्थिव जम्मू-काश्मीरमधील दलपत गावात नेण्यात आले. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. त्यांना दोन मुलं आहेत. 10 वर्षांची मोठी मुलगी पवना तिच्या वडिलांसाठी खूप रडली. वडिलांच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाली, "तुम्ही उठत का नाहीत, मला काही नको आहे. प्लीज तुम्ही फक्त परत या पप्पा." हे ऐकून गावातील लोकांना देखील अश्रू अनावर झाले.
नीलम सिंह यांची पत्नी वंदना सतत आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि आपला नवरा जग सोडून गेला यावर विश्वासच बसत नव्हता. नीलम सिंह यांना सात वर्षांचा अंकित नावाचा मुलगा आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील घनदाट जंगलातील कंडी भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये नीलम सिंह यांचा समावेश होता. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी या भागात लष्कराचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे.
वंदना यांनी पतीला अखेरचा नतमस्तक करताच संपूर्ण गाव 'नीलम सिंह अमर रहे'च्या घोषणांनी दुमदुमले. नीलम सिंह यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा भाऊ आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF चे जवान अंगद सिंह यांनी 'जय शहीद, जय सेना, जय हिंद' च्या घोषणा दिल्या. नीलम सिंह गेल्या वेळी घरी आल्याची आठवण करून देत त्यांचे वडील हुरदेव सिंह म्हणाले की, मला मुलाचा अभिमान आहे.
ते म्हणाले, "मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. तो एक धाडसी कमांडो होता ज्याने दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. तो योद्धा म्हणून जन्माला आला. लहानपणी तो सैन्यात भरती होण्याबद्दल बोलत असे." वडिलांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मुलगा घरी आला होता. तो इतका कर्तव्यदक्ष होता की त्याने फक्त चहा घेतला आणि निघून गेला. हुरदेव यांच्या म्हणण्यानुसार, नीलम सिंह 2003 मध्ये सैन्यात दाखल झाले होते.