पेपर झोपेत तपासले?; 12वीच्या 4 हजार विद्यार्थ्यांचे गुण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 12:24 PM2018-07-25T12:24:41+5:302018-07-25T12:25:26+5:30
सीबीएसई बोर्ड परीक्षेतील बारावी पास विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालात पुन्हा एकदा घोळ झाल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली - सीबीएसई बोर्ड परीक्षेतील बारावी पास विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालात पुन्हा एकदा घोळ झाल्याचे समोर आले आहे. या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्ज केले होते. त्यानंतर, चक्क 50 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे गुण वाढून आले आहेत. या परीक्षेतील टॉपर नागपूरमधील इशरिता गुप्ताने सर्वप्रथम फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनीही फेरतपासणीसाठी अर्ज केला.
इशरिता गुप्ताला राज्यशास्त्र विषयात कमी गुण मिळाले होते. तर इतर सर्वच विषयात 95 पेक्षा अधिक गुण होते. त्यामुळे इशरिताने फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी, इशरिताच्या 17 उत्तरांमध्ये चुकीच्या पद्धतीने गुण देण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर, दिल्लीतील एका विद्यार्थ्यालाही तीन उत्तरांमध्ये चुकीचे गुण दिल्याचे समोर आले. त्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या ज्या विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्ज केला. त्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना गुण वाढून मिळाले आहेत. बारावीतील 9111 विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 4632 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत चूक आढळून आली आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या बरोबर उत्तरावरही शून्य गुण देण्यात आले होते. त्यांची उत्तरे न तपासताच त्यांना हे गुण देण्यात आले होते. याप्रकरणी सीबीएसईने 214 शिक्षकांची चौकशी सुरू केली आहे.