देशातील निवडणुकीत प्रथमच झाले पेपरलेस मतदान; आयोगाची भोपाळमध्ये कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 08:04 AM2024-09-13T08:04:47+5:302024-09-13T08:05:14+5:30
मतदारांच्या घेतल्या सह्या अन् ठसे, मतदानाची टक्केवारी आणि बॅलेट पेपरचा हिशेबही ऑनलाइन करण्यात आला.
भोपाळ : मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने भोपाळ जिल्ह्यात झालेल्या पंचायत पोटनिवडणुकीच्या मतदान केंद्रावर पेपरलेस मतदान यशस्वीरीत्या पार पाडले. या मतदान केंद्रावर ८४ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव अभिषेक सिंह यांनी सांगितले की, आयोगाने देशात प्रथमच रतुआ रतनपूर ग्रामपंचायतीच्या २९५ मतदान केंद्रांवर पेपरलेस मतदान केले. पंचायत आणि नगरपालिकांमध्ये पारदर्शक मतदान करण्यासाठी पेपरलेस मतदान केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रक्रिया काय?
पेपरलेस मतदान केंद्रे तयार करून फॉर्म डिजिटल केले जात आहेत. रतुआ रतनपूरमध्ये पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला. या प्रक्रियेमध्ये मतदारांची ओळख आणि मतदान केले हे कळण्यासाठी स्वाक्षऱ्या आणि अंगठ्याचे ठसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड केले जातात.
उमेदवारांना दिली ई-मेलवर माहिती
मतदानाची टक्केवारी आणि बॅलेट पेपरचा हिशेबही ऑनलाइन करण्यात आला. दर दोन तासांनी सर्व प्लॅटफॉर्मवर मतदानाच्या टक्केवारीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. मतदान पूर्ण झाल्यानंतर बॅलेट पेपरबद्दल सर्व माहिती उमेदवार आणि मतदान प्रतिनिधींना त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात आली, असे या अधिकाऱ्याने सांगितले.