"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 02:36 PM2024-10-28T14:36:13+5:302024-10-28T14:37:11+5:30
Pappu Yadav News: गँगस्टर लाॉरेन्स बिश्नोई गँगकडून बिहारमधील खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर पप्पू यादव यांनी याबाबत बिहार पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे.
गँगस्टर लाॉरेन्स बिश्नोई गँगकडून बिहारमधील खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर पप्पू यादव यांनी याबाबत बिहार पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून पप्पू यादव यांनी याबाबत कल्पना दिली आहे. पप्पू यादव यांनी आपल्याला झेड दर्शाची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. पप्पू यादव यांनी सांगितले की, मला सध्या वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली जात आहे. मात्र सातत्याने मिळत असलेल्या धमक्यांमुळे माझ्या जिवाला धोका आहे. जर सुरक्षाव्यवस्थेत वाढ झाली नाही तर कधीही माझी हत्या होऊ शकते.
पप्पू यादव म्हणाले की, मला लॉरेन्स गँगकडून धमक्या मिळत आहेत. तसेच माझी हत्या झाल्यास त्यासाठी सरकार जबाबदार असेल. पप्पू यादव यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपल्यासोबत पोलीस एस्कॉर्ट आणि कार्यक्रम स्थळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी केली आहे.
पप्पू यादव यांनी पुढे सांगितले की, देशामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँग सातत्याने हिंसक घटना घडवून आणत आहे. मी राजकारणी असल्याने लॉरेन्स बिश्नोई गँगला विरोध केला आहे. त्यामुळे या गँगच्या प्रमुखाने मला फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. मात्र सरकार माझ्या सुरक्षेबाबत निष्क्रिय दिसत आहे. कदाचित माझ्या हत्येनंतरच लोकसभा आणि विधानसभेत मला श्रद्धांजली वाहण्यासाठी सरकार सक्रिय होईल, असं मला वाटतंय. दरम्यान, पप्पू यादव यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आधी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेखही गृहमंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात केला आहे. माझ्यावर अनेकदा नेपाळमधील माओवादी संघटनांसह काही जातियवादी गुन्हेगारांनी जीवघेणा हल्ला केला होता, केवळ मी देवाच्या कृपेने वाचलोय, असेही पप्पू यादव यांनी या पत्रात लिहिले आहे.