प. बंगालमध्ये काँग्रेसचा डाव्यांशी युतीवर भर
By admin | Published: February 2, 2016 02:54 AM2016-02-02T02:54:12+5:302016-02-02T02:54:12+5:30
काँग्रेस पक्ष प. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी युती करणार असल्याचे तर्कवितर्क सुरू असतानाच प्रदेश नेत्यांनी सोमवारी उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन तळागाळातील
नवी दिल्ली/ कोलकाता : काँग्रेस पक्ष प. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी युती करणार असल्याचे तर्कवितर्क सुरू असतानाच प्रदेश नेत्यांनी सोमवारी उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन तळागाळातील कार्यकर्त्यांची भावना त्यांच्या कानावर घातली. कार्यकर्त्यांनी डाव्यांशी युती करण्यावर भर दिल्याचे संकेत मिळाले आहेत.
बैठकीत आम्ही संपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहेत. मी कुणाशीही युती करण्याच्या बाजूचा नाही, मात्र तळागाळातील कार्यकर्त्यांनी युती करण्याला अनुकुलता दर्शविली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी स्पष्ट केले. त्यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी कोलकात्यावरून संपर्क साधण्यात आला होता.
राहुल गांधी यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. ते या मुद्द्यावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असून लवकरच अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)तृणमूलमुळेच काँग्रेस कमकुवत...
तृणमूल काँग्रेसने २०११ मध्ये काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी वापर करून घेतला होता. राहुल गांधी यांना त्याबाबत माहिती आहे, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ओमप्रकाश मिश्रा यांनी सांगितले.
मिश्रा यांनी यापूर्वीही दोनदा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून डाव्यांशी युती करण्याला अनुकूलता दर्शविली होती. माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि माकपचे प्रदेश सचिव सूर्जाकांता मिश्रा यांनी काँग्रेसला हातमिळवणी करण्याचे आवाहन केले आहे, हे उल्लेखनीय.