प. बंगाल नको, बंगालच म्हणा
By Admin | Published: August 3, 2016 05:09 AM2016-08-03T05:09:07+5:302016-08-03T05:09:07+5:30
पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्याचे नाव बदलून ते इंग्रजीत ‘बंगाल’ व बंगाली भाषेत ‘बांगला’ किंवा ‘बंग’ असे करण्याच्या प्रस्तावास ममता बॅनर्जीच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.
कोलकाता : भारतीय संघराज्यातील पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्याचे नाव बदलून ते इंग्रजीत ‘बंगाल’ व बंगाली भाषेत ‘बांगला’ किंवा ‘बंग’ असे करण्याच्या प्रस्तावास ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.
राज्य विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर करून घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. विधानसभेतील तृणमूल काँग्रेसचे बहुमत पाहता तेथे हा प्रस्ताव मंजूर होण्यात काही अडचण येण्याचे कारण नाही. केंद्र सरकारला मात्र राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेऊन या नावबदलासाठी संसदेत घटनादुरुस्ती मंजूर करून घ्यावी लागेल. ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या कालखंडाचा ठसा पुसून टाकण्याचा एक भाग म्हणून राज्याच्या नावात असा बदल करण्याची फार दिवसांची मागणी आहे. बंगाली अस्मितेशीही हा विषय निगडित आहे. यानुसारच ब्रिटिशांनी केलेले ‘कलकत्ता’ पुन्हा ‘कोलकाता’ झाले आहे.
राज्याच्या नावातून ‘पश्चिम’ हा शब्द वगळण्याचा आग्रह धरणाऱ्यांचे म्हणणे असे की, ब्रिटिशांनी त्यांच्या फूटपाडू राजकारणासाठी धर्माच्या आधारावर बंगालची फाळणी केली आणि मुस्लीम बहुसंख्य असलेला बंगालचा पूर्व भाग ‘पूर्व बंगाल’ आणि हिंदू बहुसंख्य पश्चिम भाग ‘पश्चिम बंगाल’ झाला. मात्र आता भारतातील एक संघराज्य असलेल्या बंगालच्या नावामागे ‘पश्चिम’ कायम ठेवण्याचे कोणतेही समर्थनीय कारण नाही. कारण पूर्वीचे पूर्व बंगाल भारताच्या फाळणीनंतर पूर्व पाकिस्तान झाले आणि त्या भागाचा आता तर बांगलादेश हा स्वतंत्र देश स्थापन झाला आहे. केवळ एकच बंगाल आता शिल्लक आहे. त्यामुळे पूर्वी वेगळेपण दाखविण्यासाठी नावामागे लावलेला ‘पश्चिम’ हा शब्द कायम ठेवण्यात काहीच हाशील नाही.
यासंदर्भात पंजाबचेही उदाहरण दिले जाते. पूर्वी एकसंघ असलेल्या पंजाबचे फाळणीने दोन तुकडे झाले. पूर्व पंजाब भारतात राहिला तर पश्चिम पंजाब पाकिस्तानात गेला. असे असले तरी हे प्रदेश ‘पूर्व’ किंवा ‘पश्चिम’ म्हणून नव्हे, तर दोन्ही देशांमध्ये फक्त पंजाब एवढ्याच नावाने ओळखले जातात. (वृत्तसंस्था)
>घटनादुरुस्ती आवश्यक
भारतीय संघराज्यातील कोणत्याही घटक राज्याच्या नावात फेरबदल करायचा असेल, तर त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करणे गरजेचे आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद २मध्ये संघराज्यातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख आहे व त्यांची सूची परिशिष्ठ १मध्ये दिलेली आहे. त्यामुळे अनुच्छेद २ व परिशिष्ठ १मध्ये दुरुस्ती करून राज्याच्या जुन्या नावाऐवजी नवे नाव नमूद करावे लागेल.
बंगालबाबत नावात हा बदल आणखीही एका दृष्टीने लाभदायी ठरणार आहे. इंग्रजी आद्याक्षरांनुसार राज्यांची क्रमवारी लावल्यास सध्या पश्चिम बंगालचे नाव १४व्या क्रमांकावर येते. नुसते ‘बंगाल’ असे नाव झाल्यावर
ते इंग्रजी आद्याक्षरांनुसार आसामनंतर लगेच दुसऱ्या क्रमांकावर येईल.