प. बंगालमध्ये गायी चोरल्याच्या संशयावरून जमावाने मारहाण करत केली दोघांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:25 AM2017-08-28T02:25:08+5:302017-08-28T02:25:21+5:30
गायी चोरल्याच्या संशयावरुन जमावाने दोन जणांची मारहाण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यात घडली.
कोलकाता : गायी चोरल्याच्या संशयावरुन जमावाने दोन जणांची मारहाण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यात घडली.
मृत एक व्यक्ती आसामचा तर, दुसरा पश्चिम बंगालमधील आहे. हफीजुल शेख (१९) आणि अन्वर हुसेन (१९) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी या दोन्ही हत्यांना दुजोरा देताना या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे रात्री एका पिकअप व्हॅनमधून गावातून चालले होते. या व्हॅनमध्ये सात गायी होत्या. बहुधा रस्त्यात भरकटल्यामुळे ते या गावातून जात होते. याचवेळी गावातील काही जणांनी ही व्हॅन रोखली. त्यानंतर व्हॅनचा चालक फरार झाला. पण, व्हॅनमधील दोन जणांना या जमावाने पकडले. हे गाय चोर आहेत असा संशय घेऊन गावकºयांनी त्यांची चौकशी केली. त्यानंतर या जमावाने त्यांना प्रचंड मारहाण केली. या व्हॅनची तोडफोड करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोघांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी व्हॅनमधील या गायी ताब्यात घेतल्या आहेत. ही घटना धूपगडी शहरापासून १५ किमी अंतरावर बडहरिया गावात घडली. मृतातील हफीजुल शेख हा आसामच्या धुबडी जिल्ह्यातील रहिवासी होता. तर, अन्वर हुसेन पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील पातालहावा येथील रहिवासी होता. हे दोघे व्यापारी होते अथवा नाही याची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.