प. बंगालमध्ये डाव्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न
By admin | Published: May 23, 2016 04:07 AM2016-05-23T04:07:22+5:302016-05-23T04:07:22+5:30
पश्चिम बंगाल विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. पक्षाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती केली होती.
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. पक्षाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती केली होती. ती मतदारांनी नाकारली. आता यापुढेही मतांची फूट टाळण्यास पक्षाला अपयश आल्यास राज्यात पक्षाच्या अस्तित्वाबद्दल गंभीर प्रश्न उभे राहतील, अशी कबुली माकपच्या एका पॉलिट ब्युरो सदस्याने दिली आहे.एकेकाळी पश्चिम बंगाल हा डाव्या पक्षांचा गट मानला जात होता. या राज्याला लालगढ म्हणूनही ओळखले जात होते; मात्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाची सदस्यसंख्या ६२वरून (२०११) एकदम ३२वर आली. काँग्रेस हा डाव्या आघाडीचा राजकीय शत्रू समजला जातो; पण आपले वैचारिक मतभेद दूर करीत पक्षाने निवडणुकीत या राजकीय शत्रूशी आघाडी केली. तसे करूनही डाव्या आघाडीला आपल्या आणखी ३० जागा गमवाव्या लागल्या.चूक कोठे झाली शोधावे लागेल
यापुढे आम्ही आमची मते आणि जनाधार गमावण्याची प्रक्रिया थांबली नाही, तर आमच्या पक्षाच्या अस्तित्वावरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. आम्ही केवळ जनतेच्या मनात काय चालले आहे, ते समजू शकलो नाही, तर गेल्या पाच वर्षांत गमावलेली शक्तीही पुन्हा प्राप्त करू शकलो नाही. काँग्रेससोबत केलेली युती जनतेला आवडली नाही. तृणमूल विरोधी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आम्ही काँग्रेसशी युती केली; पण ती आमच्या विरोधात गेली. लोकांना ही युती पसंत पडली नाही. बेरोजगारी, भ्रष्टाचार, औद्योगिकीकरण आदी मुद्दे उपस्थित करूनही जनतेने ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांना मते दिली हे आम्ही नाकारू शकत नाही. आमची नेमकी चूक कोठे झाली हे शोधावे लागेल. आमची निवडणुकीतील दिशा बरोबर होती की नाही, की जनतेपासून आम्ही दुरावलो आहोत, हे पाहावे लागेल.
- माजी खासदार हन्नान मुल्ला, माकप पॉलिट ब्युरो सदस्य (वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत )डाव्या पक्षांच्या मतदारांची काँग्रेसला मते पडली; पण काँग्रेसची मते डाव्या पक्षांना पडली नाहीत, असे दिसते. - मोहम्मद सलीम, माकपा पॉलिट ब्युरो सदस्य