Parag Agrawal: ट्विटरचं भविष्य अंधारात, मस्कसोबत डिल होताच पराग अग्रवालांचं भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:57 PM2022-04-26T12:57:09+5:302022-04-26T12:58:28+5:30
ट्विटरची विक्री झाल्यानंतर आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
नवी दिल्ली - एलॉन मस्क यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केली आहे. सुमारे ४४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीमध्ये हा व्यवहार झाला आहे. त्याबरोबरच २०१३ पासून पब्लिक चालत असलेली ही कंपनी आता प्रायव्हेट झाली आहे. ट्विटरची विक्री झाल्यानंतर आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर, पराग अग्रवाल यांनीही या व्यवहारानंतर मोठं विधान केलं आहे. त्यामुळे, सध्या ट्विटरची चांगलीच चर्चा आहे.
ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीतून बाहेरची वाट दाखवली गेल्यास त्यांना सुमारे ४.२ कोटी डॉलर (सुमारे ३२१.६ कोटी रुपये) मिळतील. रिसर्च फर्म Equilar ने दिलेल्या माहितीनुसार जर सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीची विक्री झाल्याच्या १२ महिन्यांच्या आत ट्विटरमधून निरोप दिला गेल्यास सुमारे ४.२ कोटी डॉलर मिळणार आहेत. सध्या, ट्विटर, एलन मस्क आणि पराग अग्रवाल सध्या ट्रेंड करत आहेत. त्यातच, अग्रवाल यांनी मोठं विधान केलं आहे.
पराग अग्रवाल यांनी सोमवारी कंपनीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एलन मस्क यांना कंपनीची विक्री केल्याने कंपनीचे भविष्य अंधारात आल्याचे अग्रवाल यांनी म्हटले. कंपनीच्या टाऊन हॉल मिटींगमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी, कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. डोनाल्ड ट्रम्प यांना कंपनीने ट्विटर अकाऊंटवरुन हटवले होते. आता, एलन मस्क आल्यानंतर पुन्हा ते ट्विटरवर सक्रीय होतील का?, असा सवाल एका कर्मचाऱ्याने विचारला होता. त्यावर, या प्रश्नाचे उत्तर एलन मस्क यांनाच विचारायला हवे, असे ते म्हणाले. दरम्यान, कर्मचारी कपात करण्याची सध्यातरी कुठलिही योजना नसल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.